सांगली : जिल्ह्यात आजपासून ‘मिशन झिरो ड्रॉपआऊट’

सांगली : जिल्ह्यात आजपासून ‘मिशन झिरो ड्रॉपआऊट’

सांगली; पुढारी वृत्तसेवा : शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरीत बालकांचा शोध घेणे व त्यांना शाळेत आणण्यासाठी दि. 5 ते 20 या कालावधीत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत 'मिशन झिरो ड्रॉपआऊट' ही मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी दिली.

ते म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारकडून मोफत शिक्षणासाठी निधी दिला जातो. गरीब कुटुंबातील मुले शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, याबाबत दक्षता घेतली जात आहे. मात्र अनेक मुले शाळांपासून वंचित राहत असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे अशा शाळाबाह्य मुलांचा शोध घेवून त्यांना शाळेत दाखल करण्यासाठी मिशन झिरो ड्रॉपआऊट उपक्रम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत 3 ते 18 तसेच 18 वर्षापर्यंतच्या दिव्यांग बालकांचा समावेश करणेत येत आहे. या कालावधतीत शाळाबाह्य बालकांच्या नोंदी घरोघरी, बसस्थानक, रेल्वेस्थानक, सार्वजनिक ठिकाणे, झोपडपट्टी, गाव, वाडया-वस्त्या गावाबाहेरची पाले, शेतमळा, स्थलांतरीत कुटुंबे, विटभट्टया, दगडखाणी, फुटपाथ, सिग्नल, अस्थायी निवारा करणारी कुटुंबे, बालमजूर, भटक्या जमाती, मोठी बांधकामे अशा अनेक ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देण्यात येणार आहे.

शिक्षणाधिकारी म्हणाले, महानगरपालिका क्षेत्रातील सर्वेक्षणाचे नियोजन प्रशासन अधिकारी, महापालिका सांगली हे करतील. 3 ते 6 वर्षे वयोगटातील सर्वेक्षणाचे नियोजन जिल्हा परिषदेतील जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी करतील. सांख्यकिय माहिती एकत्रित करण्यासाठी राज्यस्तरावरुन ऑनलाईन लिंक तयार करणेत येत आहे. मुलांची नोंद घेण्याकरीता अ, ब, क व ड प्रपत्रांचा वापर करणेत येत आहे. जिल्हा, तालुका व गावस्तरावर समित्या गठित करणेत आल्या आहेत. सर्व स्तरावरील समित्यांच्या बैठका आयोजित करण्याबाबत गटविकास अधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सर्व लोकप्रतिनिधी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व शालेय व्यवस्थापन समिती, नागरिक, पालक, स्वयंसेवी संस्था, युवक मंडळे यांचा या मोहिमेत सहभाग घेण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news