

सांगली; पुढारी वृत्तसेवा : खुनाच्या प्रयत्नासह गंभीर गुन्ह्यांची मालिका रचलेल्या गुंड बाळू भोकरेसह तीन टोळ्यांना मंगळवारी तडीपारी कारवाईचा दणका बसला. जिल्हा पोलिसप्रमुख दीक्षित गेडाम यांनी ही कारवाई केली. तीन टोळ्यांत 11 गुन्हेगारांचा समावेश आहे. यामध्ये कुपवाडच्या मनोज रूपनरचाही समावेश आहे.
गुंड महेंद्र उर्फ बाळू वसंत भोकरे (वय 45, रा. भोईराज हौसिंग सोसायटी, गणेशनगर), अक्षय ब्रम्हनाथ दुग्गे (वय 27, रा. शिकलगार गल्ली, खणभाग), धीरज बाबासाहेब कोळकर (वय 25, रा. पाचवी गल्ली, गणेशनगर) व अक्षय माणिक शिंदे (वय 25, रा. भगतसिंग चौक, गणेशनगर, सांगली) या टोळीला सांगली, कोल्हापूर व सातारा या तीन जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे.
बाळू भोकरे हा टोळीप्रमुख आहे. टोळीविरुद्ध खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्र बाळगून दहशत माजवित दुखापत करणे, बेकायदा जमाव जमवून मारहाण करणे, शिवीगाळ, दमटाटी, विनयभंग व अपहरण करणे, असे गंभीर गुन्हे शहर पोलिस ठाण्यात नोंद आहेत.
कुपवाडच्या दुसर्या टोळीतील मनोज अशोक रुपनर (वय 24, रा. श्रीमंत कॉलनी), गणेश विजय डोईफोडे (वय 24, रा. शिवनेरीनगर), अनिकेत उत्तम वायदंडे (वय 32) व सुशांत महादेव जोडरट्टी (वय 27, रा. कापसे प्लॉट) या टोळीलाही सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे. टोळीविरुद्ध चोरी, घरफोडी, गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी, दरोड्याचा प्रयत्न, विनयभंग, असे गंभीर 17 गुन्हे कुपवाड पोलिस ठाण्यात नोंद आहेत. मनोज रुपनर हा टोळीप्रमुख आहे.
तिसरी टोळी विश्रामबाग हद्दीतील आहे. अय्याज शकील शेख (वय 25, रा. शामरावनगर), अक्षय जयवंत निकम (वय 23, रा. मुसळ प्लॉट) व सुशांत सावंत शेडबाळे (वय 20, रा. गल्ली क्रमांक सहा, हनुमाननगर, सांगली) या टोळीला सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे. या टोळीविरुद्ध खुनाचा प्रयत्न, अपहरण, चोरी, जबरी चोरी, घातक शस्त्राने दुखापत करणे, लैंगिक छळ, असे नऊ गुन्हे दाखल आहेत. सांगली शहर, विश्रामबाग व कुपवाड पोलिसांनी या तिनही टोळ्यांवर तडीपारीचा प्रस्ताव तयार केला होता.
जिल्हा पोलिसप्रमुख दीक्षित गेडाम यांच्यासमोर या प्रस्तावावर सुनावणी सुरू होती. ती मंगळवारी पूर्ण झाली.
गुंड बाळू भोकरे…हे नाव पोलिसांच्या रेकॉर्डवरुन कधीच कमी झाले नाही. गेली 23 वर्षे तो गुन्हेगारीत सक्रिय आहे. पडद्याआड राहून त्याच्या नेहमीच गुन्हेगारी कारवाया सुरुच राहिल्या. खुनाचेही त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल होते. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यांतर्गतही त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती.