

मिरज; पुढारी वृत्तसेवा : मिरजेतून जाणार्या दोन राष्ट्रीय महामार्गाचे काम गतीने करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व ठेकेदारांना देण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे ठेकेदार प्रतिनिधी व क्वालिटी कंट्रोलचे प्रतिनिधी यांच्यामध्ये यावेळी वाद झाला. आमदार सुरेश खाडे यांच्या उपस्थितीमध्ये मिरज प्रांत कार्यालयात ही बैठक झाली.
रत्नागिरी-नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग मिरजेतून जात आहे. त्याचे काम सध्या मिरजेत सुरू आहे. कृष्णाघाट रस्त्यावरील एका वस्तीत राहणार्या काही नागरिकांनी हे काम थांबवण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत या बैठकीत चर्चा झाली. यावेळी पोलिस बंदोबस्त घेऊन हे काम पुढे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे काम संथगतीने मिरजेत सुरू आहे. याबाबत सविस्तर चर्चा झाली. पावसाळ्यापूर्वी हे काम गतीने करण्याच्या सूचना आमदार खाडे यांनी यावेळी दिल्या.
यावेळी क्वालिटी कंट्रोल व संबंधित ठेकेदारांमध्ये समन्वय नसल्याचे समोर आले. क्वालिटी कंट्रोलकडून तात्पुरत्या स्वरुपाचे प्रमाणपत्र दिले असल्याचे ठेकेदाराच्या प्रतिनिधींनी सांगितले. ज्या पद्धतीने रस्त्याचे लेअर करण्यात येईल, त्याच पद्धतीने क्वालिटी कंट्रोलचे प्रमाणपत्र दिले जाईल, असेही यावेळी क्वालिटी कंट्रोलच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले.
हा मार्ग पूर्ण करण्यासाठी येणार्या विविध अडचणींचीही चर्चा यावेळी करण्यात आली. या रस्त्यावर काही झाडे आहेत. ती हटवली पाहिजेत, असे संबंधित ठेकेदाराच्या प्रतिनिधींनी सांगितले. त्यानंतर महापालिका आयुक्त यांना याबाबत माहिती देण्यात आली. वृक्षतोडीबाबत प्रस्ताव पाठवून ही झाडे तोडण्याचा निर्णय घेण्यात आला.