

सांगली ः पुढारी वृत्तसेवा भरधाव ट्रॅक्टर ट्रॉलीने जोराची धडक दिल्याने बुधगाव (ता. मिरज) येथील अनंत गणेश भिरंगी (वय 77) हे ठार झाले. बुधगाव नाक्यावरील स्टेट बँकेसमोर हा अपघात झाला. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद आहे. अनंत भिरंगी हे मोपेडवरून (क्र. एमएच 10 ए-9565) स्टेट बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. पैसे काढून ते परत दुचाकीवरून घरी जाण्यासाठी निघाले होते. बँकेसमोरून ते रस्त्यावर येताना माधवनगरकडे निघालेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीने (क्र. एमएच 2 एबी-5200) त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये ते उडून रस्त्यावर पडले.
त्यांच्या डोक्याला मार लागल्याने प्रचंड रक्तस्त्राव झाला. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. 23 जूनरोजी हा अपघात झाला होता. ग्रामस्थांनी भिरंगी यांना रुग्णालयात दाखल केले होते. पण, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रॅक्टर तिथेच सोडून चालकाने पलायन केले. ट्रॅक्टरच्या क्रमांकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप शिंदे तपास करीत आहेत.