चंद्रकांत दादा टोपी सांभाळा.. हवा बदलत आहे : खासदार संजय राऊत यांचा टोला

संजय राऊत
संजय राऊत

सांगली : पुढारी वृत्तसेवा : कसब्यात शिवसेनेच्या मदतीने भाजपाचा विजय होत होता. आता बदल होत आहे. महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी एकत्र आल्याने त्यांची जागा त्यांना कळाली आहे. कसबा ही तर सुरुवात आहे. हा पॅटर्न आम्ही सांगली, मिरजेसह सर्वत्र राबवणार आहोत. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आता कोथरुडमधून लढणार आहेत का? पुण्याची हवा बदलली आहे, चंद्रकांत दादा टोपी सांभाळा, असे आव्हान खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी सांगली येथे पत्रकार परिषदेत दिले.

ते म्हणाले, सांगली, कोल्हापूर मध्ये जे स्वागत झाले ते माझे नाही, शिवसेनेचे आणि उद्धव ठाकरेंचे आहे. जे कसब्यात झाले ते २०२४ मध्ये सांगली, मिरजेत आणि राज्यात होईल. सर्व जातीधर्माचे आणि मुस्लिम, दलित बांधव आमच्याबरोबर आहेत. निवडणूक आयोगाचा निर्णय हा कागदावरचा आहे, तो जनतेचा नाही. तो कळण्यासाठी निवडणूक घ्या, जनता ठरवेल. ज्यांना तुम्ही पक्ष आणि चिन्ह दिले, त्या पक्षाची मते का कसब्याच्या निवडणुकीमध्ये पडली नाहीत?.

मनसेचे संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी ते म्हणाले, कोणावर हल्ला झाला मला माहिती नाही. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हल्ले होत असतात. अशा किरकोळ प्रकरणात शिवसेना पडत नाही. सनसनाटी निर्माण करून लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी काही लोक हा उद्योग करतात. मुंबईत कोणत्या राजकीय नेत्यावर अशाप्रकारे हल्ले होत असेल, तर पोलिसांनी ती बाब गांभीर्याने घ्यायला हवी. आमचे नाव घेऊन काय होणार? पेपरमध्ये दोन दिवस बातमी येईल.

हक्कभंगासंदर्भात विधीमंडळाच्या समितीकडून देण्यात आलेल्या नोटिसीवर ते म्हणाले, मला कुठे नोटीस मिळाली आहे? मी दौऱ्यावर आहे. माझ्यापर्यंत नोटीस पोहोचली नाही. नोटीस माझ्या हातात यावी लागेल. माझ्या कार्यालयात आली असेल, पण माझ्या हातात आली नाही, ती आल्यावर कायद्याचा अभ्यास करावा लागतो, तो आम्ही करू. त्यानंतर बघू. प्रमुख लोकांचे फोन टॅपिंग होतात. त्यावर महाविकास आघाडी सरकारच्या काळात वरिष्ठ अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल केले होते. या सरकारने ते मागे घेऊन त्यांना प्रमोशन दिले आहे. यावेळी जिल्हाप्रमुख संजय विभुते, संघटक दिगंबर जाधव, मयूर घोडके आदि उपस्थित होते.

मिरजेची जागा देण्याचा निर्णय चुकला

ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत मिरजेची शिवसेनेची जागा भाजपा देण्याचा आमचा निर्णय चुकला. आता पुन्हा ती चूक होणार नाही. सांगली, मिरजेत आता भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news