

सांगली : झरे (ता. आटपाडी) येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेवर पडलेल्या दरोड्याचा छडा लावण्यात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला यश आले. या दरोड्याप्रकरणी उत्तर प्रदेशमधील मुख्य संशयितासह चौघांना अटक करण्यात आली आहे. 3 कोटी 25 लाख 54 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये मुख्य संशयित राहुल रंजमीश शर्मा (वय 27, रा. ककराला, जि. बधायू, उत्तर प्रदेश), सूत्रधार विश्वजित विजय पाटील (वय 24, रा. बांबवडे, ता. पलूस, जि. सांगली), संकेत अरुण जाधव (वय 26, रा. बलवडी, ता. खानापूर) आणि इजाज राजू आत्तार (वय 30, रा. आमणापूर, ता. पलूस) अशी त्यांची नावे आहेत. या दरोड्यातील एक कोटी 57 लाख 68 हजार रुपये किमतीचे एक किलो 168 ग्रॅम सोन्याची लगड, 87 लाख रुपये किमतीचे 28 किलो चांदीचे दागिने, 70 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 10 लाख रुपये किमतीची कार, 26 हजार रुपयांचा गावठी कट्टा व जिवंत काडतूस, 9 हजार रुपये किमतीचा गॅस कटर सिलिंडरचा बाटला आणि 51 हजार 600 रुपयांच्या नोटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आटपाडीमधील झरे येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेवर दि. 7 रोजी मध्यरात्री दरोडा पडला होता. चोरट्यांनी बँकेचे लॉकर गॅस कटरच्या साहाय्याने तोडून त्यातील सोने, चांदीचे दागिने आणि रोकड असा कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल चोरून पोबारा केला होता. या घटनेमुळे सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली होती. चोरट्यांनी घटनास्थळी कोणताही सुगावा मागे ठेवला नव्हता. तसेच बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआरही सोबत नेला होता. त्यामुळे या गुन्ह्याचा छडा लावण्याचे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले होते.
या गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारावकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे यांना दिले होते. त्यानुसार त्यांनी सहायक निरीक्षक जयदीप कळेकर आणि पंकज पवार या दोघांची वेगवेगळी पथके तयार करून ते याचा तपास करीत होते. दरम्यान, घटनास्थळी चोरट्यांचा कोणताही सुगावा नसल्याने तपासात अडचणी निर्माण झाल्या होत्या. परंतु चोरट्यांनी घटनास्थळी टाकलेल्या गॅस कटरच्या बाटल्याच्या आधारे या दरोड्याचा छडा लावण्यात यश आले.
घटनास्थळी पडलेल्या गॅस कटरच्या बाटल्याची उत्तर प्रदेशमध्ये निर्मिती केली जात होती व या कंपनीकडून पलूसमधील एका विक्रेत्यालाच सांगली जिल्ह्यात गॅस कटरचा बाटला दिला जात असल्याचा सुगावा उत्तर प्रदेशमधील कंपनीकडून पोलिसांना मिळाला होता. त्यानुसार पोलिसांनी संबंधित गॅस कटर बाटला विक्रेत्याकडे चौकशी केली. त्यावेळी दोघांनी त्यांच्याकडून एका दुकानाच्या नावावर हा बाटला नेत्याचे दिसून आले. त्या व्यक्तीचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे तपास केला असता, इजाज आत्तार हा आमणापूरजवळ मिळून आला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने उत्तर प्रदेशमधील सहकाऱ्यांच्या मदतीने हा दरोडा टाकल्याचे समोर आले.
दरम्यान, विश्वजित पाटील हा उत्तर प्रदेशमध्ये गलाई व्यावसायिक म्हणून काम करीत होता. यावेळी त्याची राहुल शर्मा याच्यासोबत ओळख झाली होती. त्या दोघांच्या ओळखीतून त्यांनी हा दरोडा टाकल्याची इजाज आत्तार याने कबुली दिली होती. त्यानुसार पंकज पवार आणि जयदीप कळेकर यांचे पथक तातडीने दिल्लीकडे रवाना करण्यात आले. त्या ठिकाणी तपास करीत असताना राहुल शर्मा हा ककराला बधायू या ठिकाणी आल्याची माहिती पथकास मिळाली होती. त्यानुसार पथकाने तातडीने छापा टाकून त्यास अटक केली. त्यावेळी त्याच्याकडे दरोड्यातील सोन्याचे दागिने मिळून आले. त्याने दरोड्याची कबुली दिल्यानंतर त्यास उत्तर प्रदेश न्यायालयाचा ट्रांझीट रिमांड घेऊन सांगलीत आणण्यात आले. यादरम्यान राहुल शर्मा याला अटक झाल्यानंतर, पसार होण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या विश्वजित पाटील यालाही सांगलीशेजारच्या जिल्ह्यातून अटक करण्यात आली.
पथक सांगलीत परतल्यानंतर या दरोड्यातील काही संशयित सांगलीवाडी येथील जुना टोल नाका येथे ऐवज विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती जयदीप कळेकर यांना मिळाली. त्यानुसार पथकाने तेथे सापळा रचला होता. त्यावेळी मिळालेल्या माहितीप्रमाणे एक कार त्या ठिकाणी आली. तातडीने पथकाने छापा टाकला. त्यावेळी त्यामध्ये संशयित मिळून आले. कारची झडती घेतली असता, कारमध्ये चांदीचे दागिने, रोकड आणि गावठी कट्टा मिळून आला. पोलिसांनी तातडीने सर्व साहित्य जप्त केले.
झरेमध्ये टाकण्यात आलेल्या दरोड्यात उत्तर प्रदेशमधील सहा, तर त्यांना मदत करणाऱ्या स्थानिक तिघांचा समावेश होता. याप्रकरणी आतापर्यंत तिघा स्थानिकांसह उत्तर प्रदेशमधील मुख्य चोरटा, अशा चौघांना अटक करण्यात आली आहे, तर अद्याप या गुन्ह्यातील पाच संशयित चोरटे पसार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.
या कारवाईमध्ये सागर लवटे, संदीप नलावडे, सागर टिंगरे, रणजित जाधव, अमिरशा फकीर, नागेश खरात, अनिल कोळेकर, अतुल माने, सोमनाथ गुंडे, सतीश माने, मच्छिंद्र बर्डे, दरिबा बंडगर, संदीप गुरव, उदय माळी, अमर नरळे, महादेव नागणे, अरुण पाटील, अमोल कदम, अमोल लोहार, प्रमोद साखरपे, सुनील जाधव, सूरज थोरात, केरूबा चव्हाण, विक्रम खोत, रोहन घस्ते, अभिजित ठाणेकर, अभिजित पाटील, अजय पाटील यांच्या वेगवेगळ्या पथकाने सहभाग घेतला.
झरेत दरोडा, पलूसमध्ये ठिय्या
मुख्य सूत्रधार विश्वजित पाटील हा पलूस तालुक्यातील बांबवडे येथील आहे. त्यामुळे त्याचा मित्र मुख्य चोरटा राहुल शर्मा याच्यासह अन्य पाच चोरटे पलूसमध्ये आले होते. त्यांनी दरोडा पडण्यापूर्वी पलूसमधील एका लॉजवर सात दिवस ठिय्या मारला होता. तेथूनच ते झरेमधील बँकेची रेकी करीत होते.
उत्तर प्रदेशमध्ये ठरला प्लॅन
राहुल शर्मा याची बँक फोडणारी नामचीन टोळी आहे. विश्वजित पाटील हा उत्तर प्रदेशमध्ये असताना त्याची त्याच्याशी ओळख झाली होती. त्यातून त्यांनी बँक लुटण्याचा प्लॅन आखला होता. त्यामुळे झरे येथील बँकेवर पडलेल्या दरोड्याचा प्लॅनही उत्तर प्रदेशमध्ये ठरला होता.
बँक फोडणारी शर्मा याची नामचीन टोळी
राहुल शर्मा याची सहाजणांची बँक फोडणारी नामचीन टोळी आहे. या टोळीने देशभरात अनेक ठिकाणी बँकेवर दरोडा टाकलेला आहे. राहुल शर्मा याला अटक करण्यात आली असून त्याचे अन्य पाच साथीदार अद्याप पसार आहेत. शर्मा टोळीने देशभरात कोठे-कोठे दरोडे टाकले, हे देखील समोर येणार आहे.
विरोध झाल्यास होणार होता गोळीबार
शर्मा याने दरोडा टाकण्यासाठी उत्तर प्रदेशमधून एक गावठी कट्टा आणला होता. मध्यरात्रीच्या सुमारास हा दरोडा टाकण्यात आला; परंतु रात्रीच्या वेळी कोणी विरोध केलाच, तर थेट गोळीबार करण्याचा मनसुबादेखील शर्माचा होता; परंतु त्या ठिकाणी कोणताही विरोध न झाल्याने ही दुर्घटना टळली होती.