

इस्लामपूर : येथील मार्केट यार्ड परिसरात किरकोळ वादातून युवकाचा दोघा भावांनी चाकूने भोसकून खून केला. ही घटना शनिवार, दि. 13 रोजी दुपारी घडली. विशाल गर्या काळे (वय 35, रा. रेठरेधरण, ता. वाळवा) असे मृताचे नाव आहे. खुनानंतर हल्लेखोरांनी पलायन केले. गर्दीच्या ठिकाणी झालेल्या खुनाने खळबळ उडाली.
पवन बिरजा पवार व दैवत बिरजा पवार (दोघेही रा. साखराळे) अशी संशयित भावांची नावे आहेत. त्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक संजय हारुगडे यांनी दिली. रात्री उशिरापर्यंत इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पारधी समाजातील अनेकजण मार्केट यार्ड परिसरात ठाण मांडून असतात. त्यांच्यात वारंवार वादावादीचे, मारामारीचे प्रकार घडतात. शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास विशाल व संशयित पवन, दैवत यांच्यात किरकोळ गोष्टींवरून वाद झाला. त्यांच्यातील वाद सुमारे अर्धा तास सुरू होता. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. पवन व दैवत यांनी विशाल याच्या पाठीत, मांडीवर चाकूने वार केले. वार वर्मी लागल्याने विशाल रस्त्यातच रक्ताच्या थारोळ्यात पडला. हल्ल्यानंतर संशयित पवन, दैवत यांनी पलायन केले. खुनानंतर तेथील व्यापार्यांनी दुकाने बंद केली.
खुनाची माहिती मिळताच अतिरिक्त अधीक्षक कल्पना बारावकर, निरीक्षक संजय हारुगडे यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मार्केट यार्ड परिसरात गर्दी झाली होती. पोलिसांनी विशाल याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पण त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना...
खुनानंतर संशयितांनी घटनास्थळावरून पलायन केले. त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. संशयितांच्या नातेवाईकांकडे चौकशी सुरू केली आहे. पोलिस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आहेत. संशयितांची तांत्रिक माहिती घेतली जात आहे. रात्री उशिरापर्यंत संशयितांचा शोध लागला नव्हता. पोलिस निरीक्षक संजय हारुगडे यांचे पथक संशयितांच्या मागावर आहे.