Sangli Crime : प्रेमविवाह मोडल्याच्या वादातून युवकाचा खून

ईश्वरपूर येथील घटना; कोयत्याने डोक्यात वार, चाकूने भोसकले; दोघांना अटक
Sangli Crime News
सूरज कांबळे
Published on: 
Updated on: 

ईश्वरपूर : प्रेमविवाह मोडल्याच्या जुन्या वादातून दोघांनी युवकाच्या डोक्यात कोयत्याने वार करून, छातीत चाकूने भोसकून निर्घृण खून केला. सूरज महादेव कांबळे (३१, रा. आंबेडकरनगर, ईश्वरपूर) असे मृताचे नाव आहे. येथील कामेरी नाका परिसरात रविवारी (दि.१) रात्री ११.४५ वाजता ही घटना घडली.

संशयित अंकित मुकुंद कांबळे (३१) आणि साहिल अनिल कांबळे (२९, दोघे रा. आंबेडकरनगर, ईश्वरपूर) यांना पोलिसांनी अटक केली. सूरज याचा चुलतभाऊ आप्पासाहेब कांबळे यांनी फिर्याद दिली आहे.

सूरज हा आई जयश्री आणि भाऊ संदीप यांच्यासह आंबेडकरनगर येथे राहत होता. तो एका सर्व्हिसिंग सेंटरमध्ये कामाला होता. बदली चालक म्हणूनही काम करत असे. त्याने २०१८ मध्ये प्रेमविवाह केला होता. त्याची मुलीच्या घरी माहिती नव्हती. अंकितने मुलीच्या घरी सूरजने प्रेमविवाह केल्याचे सांगितले. त्यानंतर २०१८ मध्येच हा विवाह मोडला. त्यावरून सूरज व अंकित यांचे वरचेवर खटके उडत होते.

रविवारी रात्री नऊ वाजता सूरज कांबळे, त्याचे मित्र श्रेयश कुपाडे आणि आदिनाथ काळे हे तिघे कामेरी नाका येथे खरेदीसाठी कपड्याच्या दुकानात गेले होते. तेथे साहिल कांबळे आला. त्याने सूरज याच्याशी वाद घालून त्याला मारहाण केली. यावेळी श्रेयश आणि आदिनाथ यांनी भांडण सोडवले. भांडणानंतर सूरज, आदिनाथ आणि श्रेयश हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. तेथून अंकितने सूरजला फोन केला. ‘भांडण मिटवायचे आहे’, असे सांगून कामेरी नाका येथे बोलावले. रात्री ११.४० वाजता सूरज, श्रेयश व आदिनाथ दुचाकीवरून कामेरी नाका येथे गेले. काही वेळात संशयित साहिल व अंकित दुचाकीवरून आले. त्यांनी तिघांना थांबवले. साहिलने कोयत्याने सूरजच्या डोक्यात अचानक वार केले. अंकितने चाकूने छातीत भोसकले. श्रेयश व आदिनाथ त्यांना अडवण्याचा प्रयत्न करीत असताना साहिल आणि अंकित हत्यारे घेऊन त्यांच्यावर धावले. त्यामुळे श्रेयश आणि आदिनाथ यांनी तेथून पळ काढला.

आदिनाथने फोन करून ही माहिती फिर्यादी आप्पासाहेब याला दिली. आप्पासाहेब घटनास्थळी आले असता सूरज फुटपाथवर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला ईश्वरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सोमवारी पुणे जिल्ह्यातून दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.