

शिराळा : पाडळी (ता. शिराळा) येथे ३८ वर्षीय तरुणाने मध्यरात्रीच्या सुमारास दारूच्या नशेत राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून घेऊन जीवनयात्रा संपविली. ही घटना गुरुवार, दि. ६ रोजी पहाटे घडली. पोपट महादेव शिंदे (वय ३८, रा. पाडळी, ता. शिराळा) असे मृताचे नाव आहे. या घटनेने पाडळी परिसरासह तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत पोपट शिंदे याच्यावर २० वर्षांपूर्वी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात ११ वर्षे मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगल्यानंतर २०२० मध्ये तो सुटून घरी आला होता. सध्या तो शेती व्यवसाय करत होता. त्याला दारूचे व्यसन होते.
सोमवार, दि. ३ रोजी त्याची पत्नी नातेवाईकांकडे काळमवाडी (ता. वाळवा) येथे गेली होती. बुधवार, दि. ५ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पोपट घरी दारू पित बसला होता. आई आक्काताई शिंदे (वय ५५) यांनी, ‘उशीर झाला आहे, जाऊन झोप’ असे सांगितले. मात्र त्याने न ऐकल्याने आई रागाने घराला लागून असलेल्या शेडमध्ये झोपण्यास गेल्या.
त्यानंतर पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास कुत्रे भुंकू लागल्याने आईला जाग आली. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता, पोपट छातीच्या डाव्या बाजूला रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला दिसला. मध्यरात्र असल्याने आणि घाबरलेल्या अवस्थेत आईने सकाळ होण्याची वाट पाहिली. सकाळी ६ वाजता आईने शेजाऱ्यांना बोलावून आणले. त्यांनी पाहणी केली असता पोपटच्या छातीतून रक्त येत होते आणि त्याच्या पायाजवळ पिस्तूल पडलेले आढळले.
याप्रकरणी मृत तरुणाची आई आक्काताई शिंदे यांनी दिलेल्या वर्दीजबाबावरून शिराळा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जंबाजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सागर वरूटे करत आहेत.
पोलिस व फॉरेन्सिक पथक घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच शिराळा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले. डॉक्टरांनी तपासणी करून पोपट शिंदे यास मृत घोषित केले. घटनास्थळी ठसेतज्ज्ञ व फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली.