

इस्लामपूर : पेठ (ता. वाळवा) हद्दीतील विहिरीत हात-पाय धुण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाला. ओंकार रणधीर माने (वय 20, मूळ रा. करकटी, ता. कवठेमहांकाळ, सध्या रा. इस्लामपूर) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. रविवारी सकाळी हा प्रकार घडला. दुपारी सांगलीच्या रेस्क्यू टीमने ओंकार याचा मृतदेह बाहेर काढला.
ओंकार हा एका खासगी कंपनीत नोकरीला होता. मित्रासोबत तो इस्लामपूर येथे राहत होता. ओंकार रविवारी सकाळी मित्रांसोबत पेठ परिसरातील विहिरीकडे गेला. ओंकार याचे मित्र विहिरीत पोहण्यासाठी उतरले. पोहता येत नसल्याने ओंकार विहिरीच्या काठावर हात-पाय धुत होता. अचानक त्याचा पाय घसरला व तो पाण्यात बुडू लागला. मित्रांनी आरडाओरडा केला. त्याला वाचवण्याचाही प्रयत्न केला, मात्र ओंकार पाण्यात बुडाला.
मित्रांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विहीर काठोकाठ भरल्याने पोलिसांनी सांगलीच्या स्पेशल रेस्क्यू फोर्स व आयुष हेल्पलाईन टीमला पाचारण केले. त्यांनी अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर ओंकारचा मृतदेह बाहेर काढला. येथील उपजिल्हा रुग्णालयात ओंकार याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. शोधमोहिमेत कैलास वडर, महेश गव्हाणे, आकाश कोलप, सागर जाधव, पवन हेगडे, कृष्णा हेगडे यांच्यासह स्पेशल रेस्क्यू फोर्स व आयुष हेल्पलाईन टीमचे सदस्य सहभागी झाले होते.