Sangli News : प्रेमास होकारासाठी तरुण चढला मोबाईल टॉवरवर

कुपवाडमध्ये ‘शोले स्टाईल’ ड्रामा; कुपवाड पोलिसांनी सुखरूप उतरविले
Sangli News
प्रेमास होकारासाठी तरुण चढला मोबाईल टॉवरवर
Published on
Updated on

कुपवाड : तरुणीने प्रेमाचा स्वीकार करावा, या मागणीसाठी एक २२ वर्षीय तरुण 'शोले' स्टाईल ड्रामा करत मोबाईल टॉवरवर चढून बसला. ही घटना कुपवाड औद्योगिक वसाहतीत शनिवारी घडली. अजय अविनाश जाधव (वय २२) असे या तरुणाचे नाव आहे. ‘संबंधित तरुणीचा होकार मिळेपर्यंत खाली उतरणार नाही’, अशी भूमिका त्याने घेतल्याने पोलिसांसह अग्निशमन दल व आयुष हेल्पलाईन टीमची मोठी धावपळ उडाली. अखेर कुपवाड पोलिसांनी अत्यंत संयमाने मनधरणी करून त्याला सुखरूप खाली उतरवले.

कुपवाड एमआयडीसीतील मयूर फिड्स कंपनीच्या पाठीमागील शेतात असलेल्या सुमारे २५० फूट उंच मोबाईल टॉवरवर अजय जाधव हा तरुण सर्वात वरच्या टोकावर जाऊन बसला. त्याने संबंधित मुलीशी फोनवरून संवाद साधल्यानंतर 'डायल ११२' वर पोलिसांना फोन करून आपण प्रेमासाठी टॉवरवर चढल्याचे सांगितले. तरुणीचा प्रेमास होकार मिळेपर्यंत खाली उतरणार नसल्याची अट त्याने घातली.

घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्याचबरोबर अग्निशमन दलाची रुग्णवाहिका आणि आयुष हेल्पलाईनची टीमही घटनास्थळी दाखल झाली. घटनेचे गांभीर्य ओळखून कुपवाड पोलिस ठाण्याचे एएसआय जितेंद्र जाधव यांनी तरुणाचा मोबाईल क्रमांक मिळवून त्याच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधण्यास सुरुवात केली. मात्र तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. पोलिसांनी त्याची समजूत काढली आणि तो टॉवरवरून खाली उतरला. त्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात हलवण्यात आले. कारवाईत कुपवाड पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आनंदराव घाडगे, जितेंद्र जाधव, प्रवीण मोहिते, राजेश कांबळे, मधुकर सरगर, सचिन झिंजे यांच्यासह पोलिस, आयुष टीम व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या पालकांशी वाद

अजय जाधव हा मूळचा छत्रपती संभाजीनगर येथील असून, वडिलांच्या निधनानंतर तो सहा वर्षांपूर्वी आईसोबत उदरनिर्वाहासाठी कुपवाड येथे आला होता. तो एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत काम करतो. संबंधित तरुणीच्या कुटुंबाशी त्याचा परिचय असून अजयचे तिच्यावर एकतर्फी प्रेम असल्याचे सांगण्यात येते. काही महिन्यांपूर्वी त्याचा संबंधित तरुणीच्या पालकांशी वादही झाला होता, त्यावेळी पोलिसांनी त्याला समज दिली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news