

आटपाडी : व्हॉट्स ॲप ग्रुपवर एका राजकीय पक्षाच्या नेत्याचा फोटो स्टेटस म्हणून ठेवल्याच्या कारणावरून गळवेवाडी (ता. आटपाडी) येथे 29 वर्षीय युवकावर काठी आणि दगडाने प्राणघातक हल्ला करण्यात आला. 7 फेब्रुवारीरोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी विशाल बबन गळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आटपाडी पोलिसांनी सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शरद प्रल्हाद काळेल, अभिजित प्रल्हाद काळेल, ज्ञानेश्वर लक्ष्मण काळेल, दीपक अंकुश काळेल, राहुल सुखदेव पाटील, दत्ता भोजा काळेल, अनिल मारुती खिलारी (सर्व रा. गळवेवाडी) अशी संशयितांची नावे आहेत.
7 फेब्रुवारीरोजी सायंकाळी गळवेवाडी येथील आडाजवळ फिर्यादी विशाल गळवे थांबले होते. यावेळी व्हॉट्सॲप ग्रुपवरील फोटोवरून झालेल्या वादाच्या रागातून संशयितांनी तिथे बेकायदेशीर जमाव जमवला. ‘तुला फार मस्ती आली आहे का?’ असे म्हणत विशाल यांना शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
हल्ल्यादरम्यान अभिजित काळेल याने विशाल यांच्या कानशिलात लगावली, तर शरद काळेल याने हातातील काठीने त्यांच्या पाठीवर जोरदार प्रहार केला. याचवेळी ज्ञानेश्वर काळेल याने दगडाने विशाल यांच्या उजव्या डोळ्यावर मारल्याने ते गंभीर जखमी झाले. इतर हल्लेखोरांनीही मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जखमी विशाल गळवे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आटपाडी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.