

सांगली : विवाहविषयक संकेतस्थळावरून झालेली ओळख तरुणीच्या चांगलीच अंगलट आली आहे. देशभरात नामांकित असणार्या या संकेतस्थळावर बनावट खाते तयार करून तरुणीला तब्बल 4 लाख 70 हजार 131 रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी मृणाल गौतम खांडेकर या तरुणीने दलाजी हाकुरे याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत माहिती अशी : मृणाल खांडेकर या दंतवैद्यक आहेत. देशातील एका नामांकित विवाह संकेतस्थळाच्या मोबाईल अॅप्लीकेशनमध्ये एका कम्युनिटी विभागात त्यांनी स्वत:चे नाव नोंद केले होते. त्यांच्या खात्यावर दलाजी हाकुरे याची रिक्वेस्ट आली. त्याची रिक्वेस्ट मृणाल यांनी स्विकारली. त्या माध्यमातून दोघांची ओळख झाली.
त्यानंतर दलाजी याने मृणाल यांच्याशी सोशल मीडियाव्दारे तसेच एका चॅटिंग अॅपच्या माध्यमातून संपर्क साधून ओळख वाढविली. वारंवार संभाषण आणि चॅटिंग करुन त्याने फिर्यादी मृणाल यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने काही कामानिमित्त मृणाल यांच्याकडून 4 लाख 70 हजार 131 रुपये घेतले. त्यानंतर त्याने संपर्क कमी केला. दिलेले पैसे परत मिळण्यासाठी मृणाल यांनी अनेकवेळा पाठपुरावा केला. परंतु दलाजी याने कोणताच प्रतिसाद दिला नाही. हा प्रकार ऑक्टोबर 2024 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत घडला. दिलेल्या पैशाची वारंवार मागणी करून देखील दलाजी याने ती रक्कम देण्यास नकार दिला. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मृणाल खांडेकर यांनी दालजी हकुरे याच्याविरोधात फसवणुकीची फिर्याद दिली आहे. विश्रामबाग पोलिस पुढील तपास करीत आहेत.