

वारणावती : मित्रांच्या सोबत चांदोली येथे पर्यटनासाठी आलेला युवक वारणा नदीत बुडून बेपत्ता झाला आहे. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. आशुतोष अशोक चौगुले (वय 27, रा. अंकलखोप, ता. पलूस) असे बेपत्ता युवकाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळी मिळालेली तसेच कोकरूड पोलिसांनी दिलेेली माहिती अशी, आशुतोष आणि सहकार्यांनी चांदोली धरणाच्या पायथ्याशी पार्टी केली. दुपारी जेवण करून तो व सोबत आलेले सहा युवक वारणा नदीमध्ये अंघोळीसाठी उतरले. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे आशुतोष पाण्यात बुडू लागला. सोबतच्या मित्रांनी तसेच स्थानिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे तो वाहत जाऊन बेपत्ता झाला. ग्रामस्थ तसेच कोकरूड व शाहूवाडी पोलिसांनी शोध घेतला; मात्र रात्री उशिरापर्यंत तो सापडला नाही. चार महिन्यांपूर्वी याच ठिकाणी वारणानगरचा एक तरुण अगदी अशाच पद्धतीने वाहून बेपत्ता झाला होता. तिसर्या दिवशी त्याचा मृतदेह सापडला. पुन्हा त्याच ठिकाणी त्याच पद्धतीने ही घटना घडली.