

भिलवडी : पोहायला गेलेल्या तरुणाचा मगरीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. अंकलखोप (ता. पलूस) येथे कृष्णा नदी घाटावर बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. अजित अनिल गायकवाड (वय 32) असे मृताचे नाव आहे.
अजित मंगळवारी (दि. 1) सायंकाळी पोहण्यासाठी कृष्णा घाटावर गेले होते. ते घरी उशिरापर्यंत न आल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यांचे कपडे व चप्पल नदी काठावरील घाटावर सापडले. नातेवाईकांनी याबाबत भिलवडी पोलिस ठाण्यामध्ये अजित बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली. वन विभाग अधिकार्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन रात्री उशिरा भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये विच्छेदन केले. त्यांच्या हातावर मगरीने चावा घेतल्याचे प्राथमिक तपासणीमध्ये दिसून आले. वन विभागाचे संतोष शिरसटवार वनक्षेत्रपाल कडेगाव, अशोक जाधव वनपाल पलूस सुजित गवते, वनपाल कडेपूर सुरेखा लोहार, वनरक्षक पलूस, भिलवडी पोलीस ठाण्याचे किरण हरुगडे यांनी शोध मोहीम राबवली. त्यांच्या कुटुंबीयांना वन विभागाकडून मदत पुरवणार असल्याची माहिती वनरक्षक वनक्षेत्रपाल संतोष शिरसटवार यांनी दिली.
वन विभागाचे अधिकारी व भिलवडी पोलिस ठाण्याचे पोलिस व नावाडी नितीन गुरव यांच्या मदतीने सकाळी दहा वाजल्यापासून शोधमोहीम राबवण्यात आली. पाणी उपसा करणार्या पाईपला त्यांचा मृतदेह अडकलेला दिसून आला.