

सांगली : बारीक-सारीक दुखणी अंगावर काढणे आणि डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वतःच मेडिकलमधून औषधे घेणे, ही सवय आरोग्यासाठी गंभीर ठरू शकते. अनेकजण साध्या वेदना, ताप किंवा सर्दीसाठी थेट मेडिकलमधून गोळ्या घेतात; मात्र यामुळे शरीरावर दुष्परिणाम होण्याची शक्यता वाढते. स्वत:च स्वत:चे डॉक्टर होऊ नका, तज्ज्ञांचा सल्ला घ्या, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांनी केले आहे.
स्वत:च परस्पर औषधे घेतल्याने चुकीचा उपचार होऊ शकतो, आजार दडपला जाऊन पुढे गंभीर स्वरूप धारण करू शकतो. विशेषतः अँटिबायोटिक्सचा गैरवापर केल्यास अँटिबायोटिक्स रेजिस्टन्स निर्माण होण्याचा धोका वाढतो, ज्यामुळे भविष्यात औषधांचा परिणाम कमी होतो. तसेच किडनी, लिव्हरवर ताण येणे, ॲलर्जी होणे किंवा औषधांचे दुष्परिणाम वाढणे... यासारखे धोके संभवतात.
आपल्याकडे व्हॉट्स अप डॉक्टर्सची संख्या फोफावली आहे. कोणीही उठतो आणि काहीही सल्ले देतो. दुर्दैवाने यावर विश्वास ठेवून अनेकजण स्वत:च स्वत:वर औषधोपचार करतात. पण तज्ज्ञांच्यामते, कोणतीही औषधे घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. थोडक्यात, आजारावर आपण आपल्या मनाने स्वतःच औषधे घेणे, ही सोय नव्हे, तर आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे.