

मांजर्डे : तासगाव तालुक्यातील सर्वच गावांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सहभागी होऊन तालुक्याचा नावलौकिक राज्यभर होईल असे काम करा. अभियानाच्या माध्यमातून तालुक्यातील गावानेच राज्यात प्रथम क्रमांक मिळवावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन आमदार रोहित पाटील यांनी व्यक्त केले.
आरवडे (ता. तासगाव) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, ग्रामसेवक व कर्मचारी यांच्यासाठी आयोजित केलेल्या एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते.
आमदार पाटील म्हणाले, मतदारसंघ प्रत्येकबाबतीत समृध्द करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी धोरण घेऊन काम करीत आहे. तालुक्यातील गावांनी राज्यस्तरापर्यंत बक्षीस मिळविले पाहिजे. गटविकास अधिकारी अविनाश पाटील म्हणाले, हे अभियान चळवळ म्हणून उभी करायची आहे. वंचित घटकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील राहूया. अभियानात सर्वांगीण विकासावर भर दिला आहे. 90 दिवसांत सर्वसमावेशक काम करा. सेवानिवृत्त विस्तार अधिकारी कृषी धनंजय थोरात व विस्तार अधिकारी (कृषी) श्रीधर कुलकर्णी यांनी अभियानाबद्दल माहिती दिली. यावेळी कृषी बाजार समितीचे सभापती युवराज पाटील, माजी सभापती संजय पाटील, आर. डी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सहा. गटविकास अधिकारी शंकर गावडे, गटशिक्षणाधिकारी प्रदीप चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कारंडे, बाल विकास प्रकल्प अधिकारी सुनील नवले सरपंच वर्षा पाटील, उपसरपंच अरविंद शिंत्रे, ग्रामसेवक प्रकाश चव्हाण, गुरुप्रसाद रसाळे यांनी संयोजन केले.