

आष्टा : येथील डांगे कॉलेज बसथांब्याजवळ भीषण अपघातात महिलेचा मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. आशा पंडितराव देशमुख (वय 65, रा. मर्दवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. समोरून आलेल्या ट्रकला वाचवण्याच्या प्रयत्नात मोटार दुभाजकावर आदळली. गुरुवार, दि. 1 जानेवारीरोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात घडला.
अपघातात चालक पंडितराव भाऊसाहेब देशमुख (वय 70), त्यांची मुलगी पूनम विकास पाटील (वय 40, रा. पारगाव, जि. कोल्हापूर) आणि सुमित्रा अनिल लवटे (वय 45, रा. मर्दवाडी) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सांगली येथे उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, मर्दवाडीचे उपसरपंच व पंडितराव देशमुख यांचे पुत्र भारत देशमुख यांनी आष्टा येथे फिटनेस क्लब सुरू केला आहे. त्याच्या उद्घाटनासाठी त्यांचे कुटुंबीय मोटारीतून (क्र. एमएच 10 डीक्यू 9497) सांगलीकडून आष्ट्याकडे येत होते. पंडितराव देशमुख स्वतः मोटार चालवत होते.
डांगे कॉलेजजवळ त्यांची मोटार आली असता, सर्वोदय साखर कारखाना रस्त्याकडून भरधाव ट्रक अचानक त्यांच्या मोटारीच्या आडवा आला. या ट्रकची धडक टाळण्यासाठी पंडितराव यांनी आपली मोटार उजव्या बाजूला वळवली, मात्र नियंत्रण सुटल्याने ती जोरात रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन धडकली. अपघातात पंडितराव यांच्या डोक्याला व दोन्ही पायांना, आशा यांच्या डोक्याला, पूनम व सुमित्रा यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. सर्व जखमींना तत्काळ सांगली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान आशा पाटील यांचे निधन झाले. घटनेची नोंद आष्टा पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास सुरू आहे.