

सांगली : मूल होत नसल्याचा बनाव करीत पत्नीला मानसिक त्रास देऊन हॉकी स्टीकने मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पती हेमंत वामन पाटील (वय 36, रा. गावदेवी, साई मंदिरनजीक, खिडकाळी, ता. पडले, जि. ठाणे) आणि वंदना जगदीश पाटील (54, रा. खिडकाळी, जि. ठाणे) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत निकीता हेमंत पाटील (30, रा. हिराबाग वॉटर हाऊस, खणभाग, सांगली) यांनी सांगली शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित हेमंत पाटील याच्यासमवेत फिर्यादी निकीता यांचा विवाह झाला होता. हेमंतने निकीता यांना मूल होणार नाही, याची काळजी घेतली होती. तरीही तो तिला मूल होत नसल्याचे कारण देत त्रास देत होता. तुला घरातून हाकलून देणार असल्याची दमबाजी करीत होता. यावरुन त्याने निकीता यांना मारहाण करून त्यांच्याकडून 85 हजार रुपये उकळले. त्याच्या परिचयातील असणारी संशयित वंदना पाटील हिच्याशी संगनमत करून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने काढून घेतले.
नंतर ते गहाण ठेवून त्यावर पैसे घेतले. याबाबत निकीता यांनी विचारणा केली असता हेमंतने हॉकी स्टीकने मारहाण केली. यामध्ये त्यांच्या पाय, पाठ आणि चेहर्यास दुखापत झाली आहे. मारहाणीबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार शहर पोलिसांनी हेमंत पाटील व वंदना पाटील या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.