

जत : जत तालुक्यातील खैराव येथे शेळ्या चारण्यासाठी रानात गेलेल्या एका विवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी घडली. अंकिता संतोष करांडे (वय 27) असे या मृत विवाहितेचे नाव असून, विहिरीतील खोल पाण्यामुळे तिचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी तब्बल सात तास बचावकार्य सुरू होते. या घटनेमुळे खैराव गावात शोककळा पसरली.
ही घटना शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. अंकिता आपल्या शेळ्या चारत असताना पिण्याच्या पाण्यासाठी गावातील एका विहिरीवर गेली होती. पाणी काढत असताना तिचा तोल गेला आणि ती विहिरीत पडली. तिच्यासोबत असलेल्या महिलांनी तत्काळ आरडाओरड केली, त्यामुळे काही वेळातच ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. मात्र, विहिरीची खोली जास्त असल्याने मृतदेह बाहेर काढणे कठीण झाले.
स्थानिक ग्रामस्थ आणि पोहणार्यांनी अंकिता यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यांनी बोराट्याच्या काठीचा वापर करून तब्बल सात तासांच्या प्रयत्नांनंतर रात्री 8 वाजता मृतदेह बाहेर काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जत येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला.
अंकिताने पाणी आणण्यासाठी जाताना आपल्या एका वर्षाच्या मुलाला विहिरीपासून केवळ 50 फुटांवर ठेवले होते. तिच्या मुलाच्या रडण्याचा आवाज तसेच तिच्यासोबत अन्य महिला असल्याने या घटनेची माहिती तत्काळ मिळाली. मृतदेह बाहेर काढल्यानंतर घटनास्थळी नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. अंकिता यांच्या पश्चात पती संतोष करांडे आणि एक वर्षाचा बाबू व तीन वर्षांचा अर्णव अशी दोन मुले आहेत. दोन चिमुकल्यांनी आईचे छत्र गमावल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.