

सांगली : येथील भारतनगर परिसरात बुधवारी रात्री दहाच्या सुमारास संजय आब्बास शिकलगार (वय 41) यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी संशयित करण शिकलगार (रा. भारतनगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, घटनेला दोन दिवस उलटूनही आरोपीला अटक न झाल्याने संतप्त नातेवाईकांनी शुक्रवारी सायंकाळी सांगली शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, संजय शिकलगार हे मजुरीचे काम करतात. त्यांनी केलेल्या रंगकामाचे पैसे मागण्यासाठी ते करण शिकलगार याच्याकडे गेले होते. त्यावेळी पैसे मागितल्याचा राग मनात धरून संशयिताने संजय यांच्या कपाळावर व डोक्याच्या मागील बाजूस कोयत्याने वार केले. या हल्ल्यानंतर जखमी संजय यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी संशयित अद्याप मोकाट आहे. ‘तुम्ही पोलिसांत तक्रार केली तर तुम्हाला सोडणार नाही’, अशी धमकी आरोपीने पुन्हा दिल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याला तत्काळ अटक करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. यासंदर्भात सांगली शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी सांगितले की, संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. लवकरच त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.