

सांगली : शहरातील गरजू महिलांना हेरणे आणि त्यांना 10 ते 40 टक्क्यांपर्यंत व्याजाने कर्ज त्यांच्या माथी मारण्यासाठी मायक्रोफायनान्स व खासगी सावकारांची टोळी सरसावली आहे. वसुलीसाठी घरात येऊन बदनामी करणे, फोनवर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे, असे प्रकार सावकारांकडून केले जातात. त्यामुळे अनेक महिला डिप्रेशनच्या शिकार बनल्या असून, काहीजणांनी आत्महत्येचाही प्रयत्न केला आहे.
पोलिसांचा ससेमिरा नको आणि कायद्याच्या कचाट्यात अडकायला नको म्हणून सावकारांनी आता भागाभागात महिला एजंट नेमलेले आहेत. या एजंट महिला मायक्रोफायनान्सने सुरू केलेल्या बैठकामध्ये जाऊन बसतात. त्या ठिकाणी दर पंधरा दिवसांतून बैठक असते. त्यावेळी कोणी हप्ता देऊ शकत नसेल, तर एजंट महिला त्यांना सावकारी कर्ज घेण्याचा आग्रह धरतात. हे कर्ज सुरुवातील महिना पाच टक्के व्याजाने असते. हे कर्ज जर वसूल झाले नाही, तर संबंधित एजंट महिला कर्जदार महिलेला दुसर्या सावकारांकडून 10 टक्के व्याजाने कर्ज घेण्यास भाग पाडते. त्यानंतर महिन्याला असलेले 10 टक्के व्याज हे नंतर आठवड्याला 10 टक्के होते. यात कर्ज घेणार्या महिला पार पिचून जातात. मिळेल त्यांच्याकडून कर्ज घेणे आणि मायक्रोफायनान्स आणि सावकाराचे कर्ज फेडण्याच्या साखळीत ती अडकते. यातून तिची सुटका होत नाही.
शहरातील खासगी सावकारीचा व्यवसाय हा छुप्या पद्धतीने सुरू आहे. सावकार पुढे न येता महिला एजंटामार्फत कर्जपुरवठा होत असतो. सावकारांचा छळ सहन न झाल्याने पोलिसात तक्रार करायची म्हटल्यास महिला एजंटाविरोधात तक्रार होते. यातून मूळ सावकार मात्र नामानिराळा राहतो.
शहरातील हजारो महिला खासगी सावकारीच्या जाळ्यात अडकलेल्या आहेत. या सावकारांकडे एवढा पैसा येतो कुठून? याचा विचार केल्यास बरेचसे राजकीय नेत्यांकडे असलेला पैसा आता सावकारांच्या माध्यमातून फिरत असल्याची माहिती मिळाली आहे. जिल्हा पातळीवर सावकारी करण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांकडे सोपवलेली आहे. काही नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या नावाने मायक्रोफायनान्स कंपन्या स्थापन करून पैसा फिरवत असल्याचे दिसते. अशा संस्थांच्या माध्यमातून शंभर टक्के वसुली केली जाते. परंतु सावकारांच्या वसुलीमुळे महिला मात्र जेरीला आलेल्या आहेत.