Sangli News : पतीच्या निधनाचा धक्का; अंत्यसंस्कारापूर्वीच पत्नीचा मृत्यू

अग्रण धुळगावातील हृदयद्रावक घटना; काही तासातच मालवली दोघांचीही प्राणज्योत
Sangli News
पतीच्या निधनाचा धक्का; अंत्यसंस्कारापूर्वीच पत्नीचा मृत्यू
Published on
Updated on

कवठेमहांकाळ : आयुष्यभर सुख-दुःखात एकमेकांची सावली बनून जगलेले दाम्पत्य मृत्यूनंतरही एकमेकांची साथ सोडू शकले नाही. अग्रण धुळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे घडलेल्या या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण तालुका हळहळला.

माजी सैनिक शिवाजी कल्लाप्पा आवळे (वय ७२) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना, पतीच्या निधनाचा मानसिक धक्का सहन न झाल्याने पत्नी छाया शिवाजी आवळे (वय ६७) यांनाही हृदयविकाराचा झटका आला आणि काही क्षणांतच त्यांचीही प्राणज्योत मालवली.

भारतीय सैन्यात दीर्घकाळ सेवा बजावून देशसेवेचे कर्तव्य पार पाडलेले शिवाजी आवळे हे गावातील शांत, मनमिळावू आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व होते. मंगळवारी सकाळी त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. कुटुंबीयांनी तातडीने उपचारासाठी नेण्याची धडपड केली; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईक, मित्रमंडळी आणि ग्रामस्थांनी आवळे यांच्या निवासस्थानी धाव घेतली. घरात शोकाकुल वातावरण असतानाच पार्थिवावर अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी पतीला अखेरचा निरोप देण्याची तयारी करणाऱ्या छाया आवळे या पूर्णपणे खचून गेल्या होत्या. पतीच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने त्या अचानक अस्वस्थ झाल्या आणि त्यांनाही हृदयविकाराचा झटका आला. उपचारासाठी नेण्यापूर्वीच नियतीने त्यांनाही हिरावून घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news