

जालिंदर हुलवान
मिरज : सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेने सांगलीत देशातील पहिले मध्यवर्ती निदान केंद्र उभारले. यानंतर देशातील दुसर्या मध्यवर्ती निदान केंद्र येथील लक्ष्मी मार्केट परिसरामध्ये पडून असलेल्या इमारतीमध्ये सुरू करण्याचा ठराव झाला आहे. या केंद्राचा श्रीगणेशा कधी होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. महापालिकेतील एका अधिकार्याकडून दुसर्या अधिकार्याला पाठविलेल्या पत्राला त्या अधिकार्याकडून केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे मध्यवर्ती निदान केंद्राचे कामच सुरू झालेले नाही.
पाच वर्षांपूर्वी सांगलीमध्ये त्रिकोणी बागेजवळ महापालिकेने मध्यवर्ती निदान केंद्र सुरू केले. महापालिकेने स्वत: सुरू केलेले हे देशातील पहिले निदान केंद्र. तत्कालीन आयुक्तनितीन कापडणीस यांच्या पुढाकाराने ते सुरू झाले. आरोग्यासाठी लागणार्या सुमारे 48 प्रकारच्या चाचण्या तेथे केल्या जातात. त्याचा सुमारे 70 हजार रुग्णांना आजपर्यंत फायदा झाला. त्या रुग्णांचे सुमारे पाच कोटी रुपये या निदान केंद्रामुळे वाचले. असेच देशातील दुसरे मध्यवर्ती निदान केंद्र मिरजेत सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता.
मिरजेच्या लक्ष्मी मार्केटच्या चौकामध्ये पूर्वी अग्निशमन विभागाचे कार्यालय व अग्निशमनची गाडी थांबत होती. हे अग्निशमन केंद्र अन्य जागेत स्थलांतरित झाले. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ही इमारत पडून आहे. तेथे हे निदान केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे केंद्र सुरू करण्यासाठी अग्निशमन केंद्राची इमारत दुरुस्त करण्याची गरज होती. त्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर 2 सप्टेंबर 2024 रोजी सांगलीतील एका ठेकेदाराला हे काम करण्याची मंजुरी देण्यात आली. सुमारे 38 लाख रुपयांच्या कामाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर हे काम 31 डिसेंबर 2024 पासून 150 दिवसांच्या आत पूर्ण करण्याचे आदेश महापालिकेच्या शहर अभियंत्यांनी संबंधित ठेकेदाराला दिले होते. मात्र ते काम सुरू झालेले नाही. शहर अभियंत्यांच्या आदेशानुसार मे 2025 मध्ये हे काम पूर्ण करावे लागणार होते. मात्र ते झाले नाही.
संबंधित ठेकेदाराने महापालिकेला जून 2024 मध्ये एक पत्र पाठविले आहे. महापालिकेच्या गोपनीय विभागाच्या जुन्या फाईलींचे गठ्ठे त्या इमारतीमध्ये आहेत. त्यामुळे ते गठ्ठे तेथून हलवावेत, असे त्या पत्रात त्या ठेकेदाराने नमूद केले. त्यानंतर महापालिकेच्या नगर अभियंत्यांनी सहायक आयुक्त व कर अधीक्षक यांना जूनमध्येच पत्र पाठविले आहे. अग्निशमन विभागाच्या इमारतीमधील दफ्तर व इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे त्यांनी पत्रात नमूद केले. पण आता ऑगस्ट उजाडला तरी सहायक आयुक्तांनी नगर अभियंत्यांचे पत्र बेदखल केले आहे. त्यामुळे येथे कामच सुरू झालेले नाही. आता आयुक्त सत्यम गांधी यांनी यामध्ये लक्ष देऊन निदान केंद्र सुरू करण्याची गरज आहे.
या केंद्रामध्ये रक्तातील हिमोग्लेबिन, ग्लुकोज, सीबीसी, रक्त गट, एचआयव्ही, डेंग्यू, चिकुनगुनिया, युरिन, ईसीजी, डिजिटल एक्सरे, लिपिड प्रोफाईल, युरिक अॅसिड, सिरम इलेक्ट्रोलाईट, सिरम मॅग्नेशियम, सिरम कॅल्शियम, टोटल प्रोटिन, युरिन प्रेग्नेन्सी टेस्ट, रॅपिड टेस्ट यासह 48 प्रकारच्या तपासण्या या अत्यंत माफक व शासकीय दरामध्ये होणार आहेत.