सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगली शहर व परिसरात रात्री आठ वाजल्यानंतर अक्षरश: 'मवाली'राज सुरू होत आहे. सराईत आणि फाळकूट गुन्हेगार रात्रीच्यावेळेस धुमाकूळ घालत आहेत. खुनीहल्ल्ला, मारामारी, घरफोडी अपरहण करुन लुटमार, दुचाकी, मोबाईल चोरी, महिलांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारुन लंपास करणे यासह अन्य गुन्ह्यांची शहरात मालिकाच सुरू आहे.
रात्री आठच्या सुमारास चौकाचौकातील पोलिस निघून जातात आणि शहर जणूकाही मवाली आणि गुन्हेगारांना आंदण दिल्यासारखे होत आहे. मद्यधुंद अवस्थतेतील तरूण टोळक्यांच्या सुसाट वेगातील गाड्या, त्यावरून सुरू असलेली गुन्हेगार आणि युवकांची हुल्लडबाजी यामुळे सर्वसामान्य नागरिकांना रात्री शहरात निर्धोकपणे फिरणे मुश्किल बनत आहे. राममंदिर ते मिरज, शंभरफुटी रोड, कोल्हापूर रोड, सांगलीवाडी ते लक्ष्मीफाटा, बायपास रोड, माधवनगररोड, विश्रामबाग कुपवाडरोड, कॉलेजकॉर्नर, आमराई रोड, यासह शहरातील अन्य प्रमुख मार्गांवर रात्रीच्यावेळेस नुसती हुल्लडबाजी सुरू असते. रात्रीच्यावेळेस पोलिस नसल्याचा फायदा घेवून हा सगळा धिंगाणा सुरू होतो. त्यामुळे सामान्य माणसाला जीव मुठीत धरूनच या मार्गांवरून जावे लागते. कधी कोणती सुसाट गाडी येवून अंगावर आदळेल, याचा अंदाजही येत नाही. पोलिस यंत्रणाही जणूकाही निवांत आहे. गुन्हा घडला की, पंचनामा करुन तो दाखल करणे, हा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. मात्र गुन्हा घडूच नये यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाताना दिसत नाहीत.
शहरात गेल्या काही दिवसांमध्ये छोट्या-मोठ्या गुन्ह्यांचीही भर पडत आहे. शहरात दररोज कुठे ना कुठे घरात घुसून महागडे मोबाईल लंपास केले जात आहेत. दोन-तीन दुचाकी चोरीला जात आहेत. मॉर्निंगवॉक, बाजारात निघालेल्या महिलांचा पाठलागकरुन त्यांच्या गळ्यातील दागिने पळविले जात आहेत. आठवडा बाजारातही असेच चोरीचे प्रकार सुरू आहेत. लिफ्ट देण्याच्या किंवा मदतीच्या बहाण्याचे अपहरण करुन लुटमार केली जात आहे. मुख्य बसस्थानकावर महिलांच्या टोळ्या सक्रिय आहेत. वाहनातील पेट्रोल व डिझेल चोरीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या आठवडाभरात शहर पोलिस ठाण्याच्याहद्दीत सलग चार दिवस लुटमारीच्या घटना घडल्या. यातील एकाही घटनेचा छडा लावता आलेला नाही.