सांगली : नागरिकांनी ज्यांचा हातात शहरं दिली, त्यांनी या शहरांना गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि असुरक्षिततेशिवाय काय दिले? या शहराच्या विकासासाठी हजार कोटी आणल्याचे ते सांगतात, मग त्यातले पाच पन्नास कोटींची कामे तरी दिसतात का? असे सवाल करून नागरिकांनी हे शहर आमच्याकडे दिले तर पाच वर्षांत राज्यात नंबर वन करून दाखवू, असे आश्वासन आमदार जयंत पाटील यांनी दिले.
सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व मित्र पक्षांच्यावतीने इच्छुक उमेदवारांच्या एकत्रित मुलाखती गुरुवारी पार पडल्या. एकत्रित मुलाखतीचा नवा पायंडा सांगलीच्या राजकारणाने पाहिला. आ. जयंत पाटील, आ. डॉ. विश्वजित कदम, खा. विशाल पाटील यांच्यासोबत सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेश नाईक, मंगेश चव्हाण, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यावेळी उपस्थित होते.
आ. जयंत पाटील म्हणाले, महापालिकेच्या 20 प्रभागांतील सर्व म्हणजे जवळपास 350 हूनही जास्त इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण झाल्या. शिवसेना ठाकरे गटाचे प्रतिनिधीही भेटले. इतरांशीही चर्चा सुरू आहे. काँग्रेस पक्ष हा जुना आणि मोठा पक्ष आहे. आम्ही सारे एकत्र येऊन ही निवडणूक लढवणार आहोत. इच्छुकांचा खूप मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सर्व पक्षांच्या समजुतीने 29 तारखेला उमेदवारीबाबतचा अंतिम निर्णय जाहीर करू. शिवसेना नेत्यांनी त्यांच्या उमेदवारांची यादी दिली आहे. त्याबाबतही दोन दिवसात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. हे शहर भयमुक्त व्हावे, अशी पोस्टर्स लागतात, अशी स्थिती या शहरात यापूर्वी कधीच नव्हती. पोलिस तक्रारदारांवरच केसेस दाखल करणार असल्याचे सांगतात, ही हुकूमशाही आहे. असल्या राजकारणाचा उबग आल्याची टीका त्यांनी केली.