

आष्पाक आत्तार
वारणावती : राज्यातील पश्चिम घाट पट्ट्यातील सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील एकूण 25 गावांना अखेर पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. केंद्र सरकारकडून अंतरीम आदेश प्रसिद्ध झाल्यानंतर या गावांमध्ये खाणकाम तसेच मोठ्या प्रमाणातील वृक्षतोडीवर बंदी लागू झाली आहे.
पश्चिम घाट परिसर जैवविविधतेच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पश्चिम घाट पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रासंदर्भात स्थापन केलेल्या गाडगीळ समितीने (पश्चिम घाट पर्यावरण तज्ज्ञ समिती) यापूर्वीच सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील काही गावांचा पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात समावेश करण्याची शिफारस केली होती. मात्र, यासंदर्भात दीर्घकाळ निर्णय न झाल्याने प्रकरण न्यायालयात गेले.यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. सुनावणीदरम्यान न्यायालयाने महाराष्ट्र वन विभागाला या दोन्ही तालुक्यांतील पर्यावरणीय स्थिती तसेच वन्यजिवांच्या अधिवासाबाबत सविस्तर सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते.
न्यायालयाच्या आदेशानुसार वन विभागाने हे सर्वेक्षण भारतीय वन्यजीव संस्थेकडे सोपवले. या संस्थेच्या संशोधकांनी 2021-22 या कालावधीत पाहणी करून अहवाल सादर केला. या अहवालात सावंतवाडी तालुक्यातील 12 आणि दोडामार्ग तालुक्यातील 13 अशा एकूण 25 गावांचा पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात समावेश करण्याची शिफारस करण्यात आली.
भारतीय वन्यजीव संस्थेचा अहवाल ग्राह्य धरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सावंतवाडी, दोडामार्ग परिसर पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार राज्य सरकारने केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला. या निर्णयामुळे संबंधित गावांमध्ये खाणकाम, मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड आणि पर्यावरणाला हानी पोहोचवणारे प्रकल्प यांवर निर्बंध लागू झाले आहेत.
तब्बल सहा वाघांची नोंद
सर्वेक्षणादरम्यान या 25 गावांच्या परिसरात तब्बल सहा वाघांची नोंद करण्यात आली. तसेच काळा बिबट्या, खवले मांजर, रानकुत्रे यांसारख्या दुर्मीळ व संकटग्रस्त वन्यजिवांचेही अस्तित्व आढळून आले. यामुळे हा परिसर जैवविविधतेच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट झाले.