

सांगली : सांगली - कोल्हापूर महामार्गाचे गेल्या काही दिवसांपासून काम सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी उशिरा रस्त्याचे काम सुरू असताना पिण्याची पाईपलाईन जेसीबीचा धक्का लागून फुटली. पाहता पाहता सारा रस्ता पाण्याने भरून गेला.
कोल्हापूर रस्त्यावरील चौपदरीकरणास प्रारंभ झाला आहे. या रस्त्याच्या कामापूर्वीच बाजूला गटारीचे काम करावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्याप्रमाणे या रस्त्याच्या बाजूस मोठी गटार काढण्यासाठी कामाचा प्रारंभ झाला. दोन दिवसात कामाला गती आली आहे. पण या लोकांनी पाण्याची पाईप, गॅसची पाईप हे पाहिले देखील नाही. गटारीसाठी चर काढण्यात आली. यासाठी जेसीबीच्या साहाय्याने ही चर काढत असताना त्यांनी पाण्याची पाईपच फोडली. जवळ-जवळ दोन ते तीन तास या पाईपमधून कारंजा सुरू होता. बघता-बघता पाण्याचा डोह साचला. या साचलेल्या फूटभर पाण्यातून वाहनांना, नागरिकांना उशिरापर्यंत ये-जा करावी लागत होती. दरम्यान, या प्रकारात मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाल्याने स्थानिक नागरिकांतून तसेच वाहनचालकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. मात्र या प्रकाराबाबत रस्त्याचे काम करणार्यांना काहीच गांभीर्य नसल्याचे दिसून आले. या झाल्या प्रकाराची संबंधित विभागाने गांभीर्याने दखल घेऊन अशा घटनांची पुनरावृत्ती टाळावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. हे जरी अजाणतेपणी झाले असले तरी पाण्याची नासाडी झालीच, पण नागरिकांना याचा त्रास देखील सहन करावा लागला.
यामुळे पाईप फुटल्यानंतर भारतनगर, आकाशवाणी, रामनगर, भोसले प्लॉट या भागात पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला. बुधवारी सकाळी पाणी सोडल्यानंतर पाण्याचे तळे पुन्हा साचले होते. महापालिकेच्या कामगारांनी याची दुरुस्ती केली व पाणी पुरवठा सुरळीत झाला.