

ऐतवडे बुद्रुक : वारणा पट्ट्यात शेतकरी रात्रीचा दिवस करून, कडाक्याच्या थंडीत पाणी देऊन पोटच्या गोळ्याप्रमाणे उसाचे पीक जपत आहे. मात्र, हाच ऊस जेव्हा कारखान्याकडे रवाना होतो, तेव्हा वाहन चालकांच्या बेफिकीरपणामुळे तो रस्त्यावर सांडत असल्याचे चित्र परिसरात आहे. या गंभीर प्रकाराकडे कारखान्यांच्या प्रशासनाने आणि वाहतूक शाखेने तातडीने लक्ष देऊन संबंधित वाहन चालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ऊस उत्पादक करत आहेत.
नोव्हेंबरपासून ऊस गाळप हंगाम जोरात सुरू आहे. चिकुर्डे, ठाणापुडे, ऐतवडे बुद्रुक वारणा टापूत विविध गावांतील ऊस उत्पादक विविध साखर कारखान्यांना ऊस पुरवत आहेत. फडावर ऊस भरताना एकही टिपूर वाया जाऊ नये म्हणून शेतकरी जिवाचे रान करतो; मात्र ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचे चालक अतिशय बेफामपणे वाहने चालवत आहेत. परिणामी, वाहनातून ऊस रस्त्यावर पडत आहे. मात्र चालक त्याकडे साधे मागे वळूनही पाहत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. अनेक ठिकाणच्या वळण रस्त्यावर उसाच्या मोळ्याच्या मोळ्या पडत आहेत. रस्ताच्या रस्ता उसाने माखत आहे. या उसाच्या तुकड्यांवरून इतर वाहने गेल्याने ते टिपूर रस्त्यावर अक्षरशः चिकटून बसले होते.
दुहेरी लूट...
शेतकरी ऊस वेळेत जावा यासाठी तोडणी कामगारांना खूश करण्यासाठी त्यांची सर्व ती व्यवस्था करतो. तोडीसाठी ठराविक रक्कम तसेच खुशाली देणे, वाहन चालकांना जेवणाचे डबे आणि प्रत्येक खेपेला एन्ट्री देखील द्यावी लागते. एवढा खर्च आणि सोय करूनही ऊस सुरक्षित पोहोचत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे.