Sangli rain : वाळवा तालुक्यात पावसाचे थैमान

सोयाबीन, भुईमूग उत्पादक संकटात; ‘ओला दुष्काळ’ जाहीर करा
Walwa rain news
वाळवा तालुक्यात पावसाचे थैमान
Published on
Updated on

इस्लामपूर/बोरगाव/गोटखिंडी/ ऐतवडे बुद्रुक : वाळवा तालुक्यात शनिवारी पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतकर्‍यांची मोठी दैना उडवली आहे. हाता-तोंडाला आलेले खरीप पीक वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. या पावसामुळे काढणी व मळणीची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत, तर ऊसतोड मजुरांचे मोठे हाल झाले आहेत.

कुरळप कृषी मंडलांतर्गत 23 गावे आणि गोटखिंडी परिसरासह संपूर्ण तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे शेतात पाणी साचले आहे. काढणीला आलेले सोयाबीन पाण्याखाली गेल्याने ते कुजण्याची भीती आहे. काही शेतकर्‍यांनी मळणी सुरू केली होती, ती कामेही थांबवावी लागली आहेत. शेतकर्‍यांनी भुईमूग काढून वाळवण्यासाठी सरीवर ठेवला होता. मात्र, तो या पावसामुळे वाहून जातो की काय, या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. गोटखिंडी परिसरात मूग, चवळी आणि हळद या पिकांमध्येही पाणी साचल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

मागील पाच वर्षांपासून शेतकरी नैसर्गिक संकटाने त्रस्त असून, उत्पादन खर्च वाढलेला असताना पदरात पडलेले पीकही निसर्गाच्या फटक्याने जात असल्याने शेतकर्‍यांचे स्वप्न मातीमोल होण्याची भीती आहे. शहरातही पाण्याचे थैमान; मुसळधार पावसामुळे इस्लामपूर शहरातही ठिकठिकाणी गटारीचे पाणी रस्त्यावर आले होते. मात्र, नगरपालिकेने भर पावसातही गटारी स्वच्छतेचे काम सुरू ठेवले होते.

ऊसतोडणी ठप्प, मजुरांचे हाल : साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाच्या तोंडावर तालुक्यात ऊसतोड मजुरांच्या टोळ्या दाखल झाल्या आहेत. काही ठिकाणी ऊसतोडणी सुरू झाली असताना, या पावसामुळे ती तत्काळ ठप्प झाली आहे. ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरल्याने त्यांचे साहित्य भिजले असून, मजुरांचे हाल होत आहेत.‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी : मुसळधार पावसाने झालेल्या पिकांच्या हानीमुळे भाजप नेते महेश पाटील यांनी तातडीने वाळवा तालुक्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी तहसीलदार सचिन पाटील यांना दिले. प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. जनावरांच्या चार्‍याची व निवार्‍याची सोय करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news