

ईश्वरपूर : राज्य शासनाच्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधात वाळवा तालुक्यातील कृष्णा-वारणा काठावरील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मंगळवारी 5 मे रोजी शासनाने जमीन अधिग्रहणाची अधिसूचना जारी केल्याचे समजताच, तालुक्यातील कामेरी, नवेखेड, बोरगाव, जुनेखेड आणि मसुचीवाडीसह विविध गावांत ग्रामस्थांनी एकत्र येत राजपत्राच्या प्रतींची होळी केली. ‘एक इंचही जमीन देणार नाही’, ‘विकास हवा, पण विनाश नको’, असा ठाम निर्धार करत शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
कामेरी गावातील बागायती क्षेत्र या महामार्गामुळे नापीक होण्याचा धोका निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. येथे राजवर्धन प्रवीण पाटील या चिमुकल्याने हातात घेतलेल्या फलकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी ‘शक्तिपीठ’ विरोधी संघर्ष समितीचे प्रवीण पाटील, सरपंच रणजित पाटील, उपसरपंच नंदूकाका पाटील यांच्यासह शेतकरी आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बोरगाव ः नवेखेड (ता. वाळवा) येथे शक्तिपीठ महामार्गविरोधी कृती समितीच्या आवाहनानुसार शेतकऱ्यांनी जमीन अधिग्रहण अधिसूचनेचे दहन केले. ‘कृष्णा काठावरील सुपीक जमीन उद्ध्वस्त करणारा हा महामार्ग आम्हाला मान्य नाही’, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव यांनी मांडली. यावेळी माजी सरपंच प्रदीप चव्हाण, उपसरपंच राजेंद्र पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. बोरगाव येथे बसस्थानक परिसरात सरपंच जितेंद्र पाटील, राजारामबापू कारखान्याचे संचालक कार्तिक पाटील व अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अध्यादेशाचे दहन करण्यात आले. जुनेखेड आणि मसुचीवाडी येथेही शेतकऱ्यांनी एकत्र येत या निर्णयाचा तीव्र निषेध केला. “हा क्रांतिकारकांचा तालुका असून, प्रसंगी रक्त सांडू, पण सुपीक जमीन जाऊ देणार नाही,“अशा भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्तकेल्या.या आंदोलनांमुळे वाळवा तालुक्यात येत्या काळात संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
ऐतवडे खुर्द ः वारणा पट्ट्यातही या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटले. ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील शिवछत्रपती चौकात अधिसूचना जाळून शासनाचा निषेध करण्यात आला. वाळवा पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश पाटील म्हणाले की, वारणा नदीमुळे येथील जमिनी सुपीक झाल्या असून, कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग होऊ देणार नाही. यासाठी गावोगावी हनुमान मंदिरात आढावा बैठका घेतल्या जात असून, महामार्गाविरोधात बंदी आदेश गोळा करण्याचे काम सुरू आहे.