

विटा : येथील एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या महिलांना अश्लील पत्रे पाठवून व पोस्टर्स दाखवून त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी मुख्य संशयित दिलीप पंडितराव कुलकर्णी (रा. कडेगाव) याला विटा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार सन २०२४ पासून ते ३० जानेवारी २०२६ पर्यंतच्या काळात घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कडेगाव येथील राहणारा संशयित दिलीप कुलकर्णी याने एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवणाऱ्या संबंधित शिक्षिका व इतर चार महिला सहकाऱ्यांना त्यांच्या पत्त्यावर पोस्टाने अश्लील पत्रे पाठवून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले होते. तसेच पगारवाढीचा विषय व हे सर्व प्रकार थांबवा, अन्यथा तुम्हाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही त्याने दिली होती.
याशिवाय अश्लील शेरेबाजी करून अश्लील पोस्टर्स दाखवून सातत्याने विनयभंग केला होता. या सर्व प्रकारामुळे त्रस्त झालेल्या एका महिलेने विटा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यावरून विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक अभिजित कणसे यांनी १३ ऑगस्ट रोजी संशयित दिलीप कुलकर्णी यास अटक केली. त्यानंतर त्यास विटा येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला १८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, याप्रकरणी या शाळेतील पाच शिक्षिकांनी थेट महिला आयोगाकडे तक्रार केली होती. यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात संबंधित दिलीप कुलकर्णी हा फरार होता. या काळात त्याला कोणी मदत केली?, संबंधित पत्रे त्याने कोणाच्या सांगण्यावरून अथवा मदतीने लिहिली?, तसेच यात आणखी कोणा-कोणाचा सहभाग आहे, याची सखोल चौकशी करावी अशी मागणी नागरी हक्क समितीचे अध्यक्ष सुनील सुतार यांनी केली आहे.