

विटा : विट्यात बुवाबाजीच्या माध्यमातून शारीरिक, मानसिक आणि आर्थिक फसवणूक करत नरबळीचा सल्ला दिल्याप्रकरणी महेश बाबर (रा. भवानी माळ, विटा), संकेत निकम (रा. घोगाव, ता. पलूस, सध्या रा. भवानी माळ, विटा) आणि सूरज उपाध्याय (रा. विटा) या तिघांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी त्यांना विटा न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने चार दिवसांची, म्हणजे सोमवारीपर्यंत, पोलीस कोठडी सुनावली.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार महिला आणि तिच्या कुटुंबीयांच्या माहितीनुसार, विट्यातील पाटील वस्ती परिसरात काही महिन्यांपासून ‘कडेश्वर धाम अध्यात्म संस्था’ नावाने आश्रम सुरू करण्यात आला होता. या ठिकाणी संशयित संकेत निकम, महेश बाबर आणि सूरज उपाध्याय हे स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत होते.
या तिघांनी संबंधित महिलेला आणि तिच्या कुटुंबीयांना वारंवार भीती दाखवत, “तुमचा नवरा मरेल”, “मुलगी मरेल”, “वाईट शक्तींचा प्रभाव आहे”, “नरबळी दिल्याशिवाय संकट टळणार नाही” अशा प्रकारची दहशत निर्माण केली. या भीतीचा फायदा घेत त्यांनी कुटुंबाकडून वेळोवेळी मोठ्या रकमा उकळल्याचा आरोप आहे.
१ मार्च २०२४ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत या तिघांनी आश्रमात तसेच पीडितांच्या घरी जाऊन विविध तोटके आणि पूजा सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. महेश बाबर आणि संकेत निकम यांनी संगनमत करून संकेत निकम यांच्या अंगात दत्तगुरू, शंकर महाराज, चिले बाबा, कालभैरव आणि अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा संचार होतो, असा खोटा दावा केला. “महाराज तुमच्या घरातील सर्व संकटे दूर करतील,” असा विश्वास त्यांनी पीडित महिला आणि तिच्या पतीला दिला होता.
यानंतर संकटे दूर करण्याच्या नावाखाली विविध पूजा, हवन आणि अघोरी विधी करण्यास सांगण्यात आले. नरबळी देणे तसेच गर्भपात करण्यासारखे कायद्याने प्रतिबंधित आणि अत्यंत गंभीर स्वरूपाचे सल्लेही दिल्याचा आरोप आहे. पूजा आणि हवनाच्या खर्चाच्या नावाखाली सूरज उपाध्याय याच्याकडे रोख स्वरूपात मोठी रक्कम देण्यास कुटुंबाला भाग पाडण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. इतकेच नव्हे, तर दुर्गाष्टमी आणि कालाष्टमीच्या दिवशी अघोरी कृत्य करत फिर्यादीच्या पतीला वेताच्या काठीने बेदम मारहाण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
पीडित कुटुंबाने यापूर्वी विटा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र त्यावेळी गंभीर दखल घेण्यात आली नसल्याचे सांगितले जात आहे. अखेर हे प्रकरण अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे गेले. अंनिसचे विवेक मोहन भिंगारदेवे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करत पुरावे गोळा केले. तसेच गुन्हा दाखल होईपर्यंत त्यांनी पीडित कुटुंबाला सहकार्य केले. यानंतर विटा पोलिसांनी तिघांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजन करत आहेत.
दरम्यान, तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवरही याच तिघांनी अत्याचार केल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. चार दिवसांपूर्वी संबंधित मुलगी तक्रार देण्यासाठी विटा पोलीस ठाण्यात गेली होती. तेथे उपस्थित अधिकाऱ्यांसमोर माहिती देत असताना तिला चक्कर आली होती. त्या वेळी पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे उपस्थित नसल्याने गुन्हा नोंद झाल्याचे सांगितले जात नाही. मात्र या प्रकरणातही स्वतंत्र गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घडामोडींमुळे नाशिकमधील ‘खरात प्रकरणा’प्रमाणे विट्यातही अशाच प्रकारचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून शहरात सुरू आहे.