

विटा: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी विटा शहराच्या अत्यंत महत्त्वाच्या रिंग रोड (बाह्य वळण रस्ता) बाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. आमदार सुहास बाबर यांनी शनिवारी नागपूर येथे गडकरी यांची भेट घेऊन मतदारसंघातील विकासकामांसंदर्भात निवेदन दिल्यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
आमदार सुहास बाबर यांनी शनिवारी (दि.१३ डिसेंबर) नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विटा शहरासाठी आवश्यक असलेल्या रिंग रोड रस्त्याच्या कामाला गती देण्यासह मतदारसंघातील अनेक प्रमुख विकासकामांचे प्रस्ताव आणि मागण्या गडकरी यांच्यासमोर मांडल्या.
विटा शहराच्या वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी रिंग रोड गरजेचा आहे. यासाठी शासनाकडे तीन प्रस्ताव यापूर्वीच सादर करण्यात आले आहेत. आमदार बाबर यांनी गडकरींना विनंती केली की, विटा रिंग रोडबाबत तात्काळ निर्णय घेऊन कामाला सुरुवात करावी.
रिंग रोड व्यतिरिक्त आमदार बाबर यांनी गडकरींकडे इतरही अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांसंदर्भात मागण्या केल्या. त्या खालीलप्रमाणे आहेत:
गुहागर ते विजापूर राष्ट्रीय महामार्ग (क्र. १६६ ई): या मार्गावरील रेणावी- रेवणगाव- सुलतान गादे- हिवरे हद्दीतील रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे.
अहिल्यानगर, बारामती, फलटण, विटा, तासगाव ते म्हैसाळ राष्ट्रीय महामार्ग (क्र. १६०): या मार्गावरील विटा ते म्हैसाळ या टप्प्यातील रस्त्याच्या कामास चौपदरीकरणासह मंजुरी देऊन ते काम त्वरित सुरू करावे.
नवीन राष्ट्रीय महामार्ग: कवठेमहंकाळ ते शेटफळे आटपाडी दिघंची म्हसवड ते फलटण या मार्गाला नवीन राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करावे.
आमदार बाबर यांनी केलेल्या या सर्व मागण्यांवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी या सर्व विकासकामांवर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले, अशी माहिती आमदार सुहास बाबर यांनी दिली आहे. गडकरी यांच्या या आदेशामुळे विटा रिंग रोडसह मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांना गती मिळणार आहे.