

विटा : विटा हद्दीत येताना राष्ट्रीय महामार्ग क्र. 160 हा लघू म्हणजे लहान झाला आहे. पाणी पुरवठ्याच्या वाहिन्या वीज, दूरसंचारच्या तारांशिवाय भुयारी गटार यासाठी जागा सोडा, असे पत्र पालिकेने राष्ट्रीय महामार्ग विभागाला दिले आहे. मात्र ते पत्र देणारा तो मी नव्हेच, असे उत्तर विटा पालिकेचे मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी सोमवारी आंदोलकांना दिले. त्यामुळे या प्रश्नाचा गुंता आणखी वाढला.
विटा शहरातून जाणारा राज्यमार्ग 10 हा दर्जोन्नती होऊन राष्ट्रीय महामार्ग 160 झाला, मात्र पूर्वी 30 मीटर असलेला हा रस्ता सध्या 21 मीटरपर्यंत कमी झाला. त्यामुळे विट्यात येताना महामार्गाचा लघुमार्ग कसा झाला, असा रास्त सवाल जनतेतून विचारला जात आहे.या प्रश्नावर विट्याचे माजी नगराध्यक्ष, भाजप नेते वैभव पाटील, पालिकेचे विरोधी गटनेते अजित गायकवाड, प्रहार जनशक्ती संघटनेचे सुनील सुतार, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे विवेक भिंगारदेवे यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष किरण तारळेकर, नगरसेवक सुमित गायकवाड, अविनाश चोथे, सुभाष भिंगारदेवे, प्रशांत कांबळे, फिरोज तांबोळी आदी आंदोलकांनी शनिवारी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला होता. त्यावेळी त्यांनी, पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला तसे पत्र दिले होते असे सांगितले होते.
याबाबत सोमवारी सकाळी या सर्व आंदोलकांनी विटा पालिकेत मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी, ते पत्र आपल्या अनुपस्थितीत येथे असलेल्या प्रभारी मुख्याधिकाऱ्यांनी दिले आहे, असे धक्कादायक उत्तर दिले.यावर वैभव पाटील म्हणाले, पालिका सभागृह अस्तित्वात आल्यानंतर नगरसेवकांना न सांगता असे पत्र कसे दिले? कोणाच्या इशाऱ्यावरून असा पत्रव्यवहार झाला? प्रशासन मनमानी करीत आहे का? पुन्हा तसेच काम सुरू केल्यास आम्ही काम बंद पाडू.
यावेळी सुनील सुतार, अजित गायकवाड, मयुरेश गुळवणी, बाळासाहेब मेटकरी, दहावीर शितोळे, अमित भोसले, ज्ञानेश्वर शिंदे, संग्राम माने, प्रशांत राठोड, भारत कांबळे, विनोद पाटील, तानाजी जाधव, विजय जाधव, सचिन जाधव, विशाल पाटील, एजाज मुल्ला, राहुल हजारे, कुमार शितोळे, केदारी सूर्यवंशी, विजय नागमल आदी उपस्थित होते.