

विटा : "आमच्या अंगात छत्रपती शिवाजी महाराज, दत्तगुरू आणि शंकर महाराज संचार करतात, ते तुमच्या घरातील सर्व संकटे दूर करतील," असा खोटा दावा करून एका कुटुंबाची शारीरिक, मानसिक व आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार विटा (जि. सांगली) येथे उघडकीस आला आहे. संकटे दूर करण्यासाठी या भोंदूबाबांनी चक्क नरबळी आणि गर्भपातासारखे अत्यंत अघोरी व कायद्याने प्रतिबंधित असलेले सल्ले दिले.
या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून विटा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महेश बाबर (रा. भवानी माळ, विटा), संकेत निकम (मूळ रा. घोगाव, ता. पलूस; सध्या रा. भवानी माळ, विटा) आणि सूरज उपाध्याय (रा. विटा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विटा येथील पाटील वस्ती परिसरात गेल्या काही काळापासून 'कडेश्वर धाम अध्यात्म संस्था' नावाचा एक नवीन आश्रम सुरू झाला आहे. या आश्रमात संशयित आरोपी लोकांचे भविष्य सांगणे, राजकीय नेत्यांना अमुक रंगाचे कपडे घालण्याचा किंवा विशिष्ट नंबरच्या गाड्या घेण्याचा सल्ला देणे, तसेच अमावास्या व पौर्णिमेला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पूजा, हवन व अघोरी तोटके करण्याचे प्रकार करत होते.
पीडित महिला आणि तिच्या कुटुंबीयांना १ मार्च २०२४ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत आरोपींनी आश्रमात आणि त्यांच्या घरी जाऊन जाळ्यात ओढले. महेश बाबर आणि संकेत निकम यांनी संगनमत करून, संकेत निकम याच्या अंगात थेट छत्रपती शिवाजी महाराज, दत्तगुरू, शंकर महाराज, चिले बाबा आणि कालभैरव यांचा संचार होतो, असा खोटा देखावा केला. घरातील संकटे दूर करण्याचे आमिष दाखवून पूजा व हवनाच्या नावाखाली संशयित सूरज उपाध्याय याच्याकडे रोख स्वरूपात मोठी रक्कम उकळण्यात आली. अघोरी कृत्ये करत दुर्गाष्टमी आणि कालष्टमीच्या दिवशी पीडित महिलेच्या पतीला वेताच्या काठीने बेदम मारहाण देखील करण्यात आली.
दीर्घकाळ चाललेल्या या आर्थिक आणि शारीरिक छळानंतर अखेर पीडित महिलेने विटा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. विटा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजन या घटनेचा पुढील तपास करत आहेत.