Sangli Job Fraud: सरकारी नोकरीच्या आमिषाने २२ लाखांची फसवणूक

विटा पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
Job Fraud
Job FraudPudhari
Published on
Updated on

विटा : सरकारी नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून एका महिलेची तब्बल २२ लाख २७ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सुनीता सदाशिव काटे (वय ४८, रा. बोबडेवाडी, लेंगरे, ता. खानापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विटा पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रियाज मुलाणी (रा. माहुली), विशाल देसाई (रा. चंदगड, जि. कोल्हापूर) आणि हिरा नामदेव पवार (रा. मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लेंगरे येथील सुनीता काटे यांचा मुलगा सूरज याला सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष या तिघांनी दाखवले होते. ८ एप्रिल २०२२ ते १० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे त्यांनी सुनीता काटे यांच्याकडून टप्प्या-टप्प्याने पैसे उकळले. यामध्ये विशाल देसाईच्या बँक खात्यावरील ३ लाख रुपये, तर हिरा पवार याच्या खात्यावरील व रोख स्वरूपात १९ लाख २७ हजार ५०० रुपये, असे एकूण २२ लाख २७ हजार ५०० रुपये या तिघांनी संगनमताने घेतले.

पैसे देऊनही बराच कालावधी उलटल्यानंतर सूरजला नोकरी लागली नाही. त्यामुळे सुनीता काटे यांनी आपले पैसे परत मागण्यास सुरुवात केली. मात्र, संशयितांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. तसेच ‘तुला काय करायचे ते कर, आम्ही पैसे देणार नाही. जर पोलिस ठाण्यात तक्रार दिली, तर जिवंत सोडणार नाही’, अशी धमकीही दिली.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुनीता काटे यांनी विटा पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी तिन्ही संशयितांविरुद्ध फसवणूक आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास हवालदार शांताराम जाधव करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news