

सांगली : नवरात्रोत्सव आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विट्यातील दोन टोळ्या पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार केल्या. यामध्ये सुजित काळे आणि प्रथमेश शिंदे या टोळींचा समावेश आहे. यामध्ये दोन्ही टोळ्यांना सांगली, सातारा आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
हद्दपार करण्यात आलेल्यामध्ये काळे टोळीतील सुजित ऊर्फ आनंदा तुकाराम काळे (वय 26, रा. लेंगरे, ता. खानापूर), अक्षय उत्तम मोहिते (वय 23, रा. जोंधळखिंडी, ता. खानापूर), आणि शिंदे टोळीतील प्रथमेश ऊर्फ पिल्या मुकुंद शिंदे (वय 19) आणि स्वप्निल दगडू खिलारे (वय 22, दोघे रा. लेंगरे, ता. खानापूर) यांचा समावेश आहे.
काळे टोळीतील टोळीप्रमुख सुजित काळे व त्याचा साथीदार अक्षय मोहिते या दोघांविरुद्ध सन 2016 ते 2024 पर्यंत अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये दरोडा, घरफोडी, गंभीर स्वरूपाची मारामारी, पिस्तूल बाळगणे, अॅट्रॉसिटी आणि शरीराविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तर शिंदे टोळीतील टोळीप्रमुख प्रथमेश शिंदे आणि त्याचा साथीदार स्वप्निल खिलारे या दोघांविरुद्ध सन 2023 आणि 24 मध्ये दुखापत करणे, बेकादेशीर जमाव जमवून मारामारी करणे, घातक शस्त्र बाळगणे, अॅट्रॉसिटी इत्यादी स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. नवरात्रोत्सव आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी दोन्ही डोळ्यांना हद्दपार करण्यात यावे यासाठी विटा पोलिसांनी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावावर पोलिस अधीक्षक घुगे यांनी सुनावणी घेतली त्यानंतर त्यांना तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे.