Sangli Crime : विट्यातील घरफोडीचा १२ तासात छडा

सव्वादोन लाखाच्या मुद्देमालासह मूकबधिर गजाआड
House Robbery
House RobberyFile photo
Published on
Updated on

विटा : बलवडी (भा.) फाट्याजवळ घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा १२ तासात यशस्वी उलगडा करण्यात विटा पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून चोरीस गेलेला २ लाख १५ हजार ५०० रुपयांचा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पृथ्वीराज संदीप साळुंखे (वय १९, रा. नेवरी रोड, शाहूनगर, विटा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून तो मूकबधिर आहे.

बलवडी फाट्याजवळ राहणारे माणिक बाळासाहेब भागवत यांच्या घरातील कपाटातून २६ ग्रॅम ७७० मि.लि. वजनाचे सोन्याचे गंठण आणि रोख ५ हजार ५०० रुपये असा एकूण २ लाख १५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. हा प्रकार १७ ते २४ जुलैदरम्यान घडला होता. याप्रकरणी माणिक भागवत यांनी २४ जुलैरोजी विटा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पोलिस पथक गस्तीवर असताना ही चोरी पृथ्वीराज साळुंखे याने केल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी साळुंखे याला शिताफीने ताब्यात घेतले. संशयित मूकबधिर असल्याने तपासात अडचण येऊ नये म्हणून मूकबधिर शिक्षिका सारिका काळे यांना पाचारण करण्यात आले. त्यांच्या मदतीने कौशल्यपूर्ण चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला अटक करून चोरीस गेलेले सोन्याचे गंठण आणि रोख रक्कम हस्तगत केली. पोलिस उपनिरीक्षक संग्राम पाटील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news