पलूस : शेतकर्यांची कर्जमाफी, वाढती गुन्हेगारी, रखडलेली विकासकामे, आणि निधीअभावी थांबलेली नागरी सुविधा याबाबत विधिमंडळात आ. डॉ. विश्वजित कदम यांनी सरकारच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका करत सरकारला जाब विचारला.
डॉ. कदम म्हणाले, पलूस-कडेगाव मतदारसंघ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी आहे. या मतदारसंघातच जागृत औदुंबर देवस्थानही आहे. मात्र, या भागातील मूलभूत प्रश्नांसाठी सरकारकडे निधीची वारंवार मागणी करूनही निधी मिळत नाही. निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आश्वासने देण्यात आली, पण निवडणुकीनंतर निकष लावून हजारो महिलांची नावे वगळण्यात आली. त्यामुळे लाडकी बहीण योजना फसवी असल्याचा आरोप त्यांनी केला.
शेतकर्यांच्या पीक विम्याची एक रुपयात अंमलबजावणी, कर्जमाफी, हमीभाव यावर सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. अवकाळी पाऊस, पूर, दुष्काळ यामुळे शेतकरी संकटात आहे, पण सरकारचे दुर्लक्ष आहे. परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबनेनंतर सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूप्रकरणी प्रशासनाची भूमिका संशयास्पद होती. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या, पुण्यात गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना आणि वाढती सायबर गुन्हेगारी हे गंभीर संकेत आहेत. त्यामुळे राज्यात गुन्हेगारीचा भडका उडाला असून, कायदा सुव्यवस्था कोलमडली आहे. पुणे-बंगळुरू महामार्गाची अवस्था अत्यंत वाईट असून जागोजागी खड्डे, रखडलेली दुरुस्ती आणि अपूर्ण कामांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.