Vishwajit Kadam | शेतकऱ्यांच्या पोटावर पाय ठेवणाऱ्या ‘शक्तिपीठ’ला विरोध : विश्वजित कदम

विश्वजित कदम : कडेगाव येथे शक्तिपीठविरोधात प्रांताधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Vishwajit Kadam | शेतकऱ्यांच्या पोटावर पाय ठेवणाऱ्या ‘शक्तिपीठ’ला विरोध : विश्वजित कदम
Published on
Updated on

कडेगाव शहर : सुपीक आणि उच्च प्रतीच्या एकरी शंभर टन उत्पन्न देणाऱ्या जमिनी सत्तेच्या ताकतीने बाधित करून शेतकऱ्यांच्या पोटावर पाय ठेवत होत असलेल्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा कायम विरोधच असेल, असे आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी येथे सांगितले. सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे, असे ते म्हणाले. जनतेच्या करामधून घेतलेल्या पैशांची अशी उधळपट्टी करू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

येथे शक्तिपीठविरोधात पलूस व कडेगाव तालुक्यातील शक्तिपीठबाधित शेतकऱ्यांच्या आयोजित मोर्च्यात ते बोलत होते. यावेळी खा. विशाल पाटील, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, सोनहिरा कारखान्याचे संचालक डॉ. शांताराम कदम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ऋषिकेश लाड, कडेगावचे सभापती डॉ. जितेश कदम, श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर, ज्येष्ठ नेते सुभाष बापू पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.

आमदार कदम म्हणाले, सरकारने कर्जमाफी, दुष्काळ अशा शेतकऱ्यांच्या समस्यावर मार्ग काढणे अपेक्षित असताना, शासन मात्र शेतकऱ्यांना वेठीस धरून त्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याचे काम करत आहे. लोकांना विश्वासात न घेता त्यांच्यावर हे लादले जात आहे. जमिनीच्या मोजण्या रात्री, अपरात्री, पहाटे करत आहेत, तेही पोलिस फौजफाटा घेऊन, ही अतिशय गंभीर आणि चुकीची बाब आहे. तीन-चार महिन्यांपासून अतिशय गोपनीय पद्धतीने हा प्रकार सुरू आहे.

डॉ. भारत पाटणकर म्हणाले, स्वातंत्र्याची दुसरी चळवळ उभी करण्यासाठी शासन आम्हाला भाग पाडत आहे. विकास म्हणजे काय असतो हे शासनाला अजून समजले नाही. शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी, शिवारात पाणी आणून, याठिकाणी शेती फुलली, कारखाने उभे राहिले, लोकांना काम मिळाले, शेतकऱ्यांना ऊस व इतर पिकांचे पैसे मिळतात हा विकास असतो.

यावेळी ज्येष्ठ नेते सुभाष बापू पाटील, महेंद्रआप्पा लाड, डॉ. जितेश कदम, डॉ. दीपक लाड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कडेगाव नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते विजय शिंदे, काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष सुनील जगदाळे, जि. प. माजी सदस्य सुरेश मोहिते, उपसभापती डॉ. विजय महाडिक, कडेगावचे नगरसेवक सागर सकटे, वांगीचे माजी उपसरपंच बाबासोा सूर्यवंशी, जि. प. सदस्या प्रियांका महाडिक, काँग्रेसचे इंद्रजित साळुंखे, ज्येष्ठ नेते उत्तमराव पवार, संदीप जगदाळे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news