

सांगली : सत्ता आणि स्वार्थासाठी, आमिषापोटी काहींनी पक्ष सोडायचा निर्णय घेतला असेलही, पण जनता काँग्रेससोबत आहे. सर्वसामान्यांच्या बळावर सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेवर महाविकास आघाडीचीच सत्ता येईल, असा विश्वास आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी व्यक्त केला. जो पाच वर्षे लोकांसोबत, त्यालाच काँग्रेसची उमेदवारी दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सांगलीत मंगळवारी शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी निवड झालेले राजेश नाईक आणि निवडणूक समिती अध्यक्षपदी निवड झालेले मंगेश चव्हाण यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. खासदार विशाल पाटील यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
आ. कदम म्हणाले, मागच्या पाच वर्षात जो प्रभागातील लोकांच्यात राहिला आहे, त्यालाच उमेदवारी देण्यात येईल. आपली आपल्या प्रभागात खरोखरच ताकद आहे का? संपर्क आहे का, याचा स्वत: विचार करा. कोणावर अन्याय झाला असेल तर त्याला न्याय मिळेलच, पण महापालिका एकत्रीतपणे जिंकायचीच आहे, या ताकदीने लढा.
खा. विशाल पाटील म्हणाले, राज्यात, देशात जातीयवादी भाजप सत्तेवर आहे. राज्य, देश भाजपमुक्त करण्याची सुरवात सांगलीपासून करुया, त्यासाठीची मशाल सांगलीतून पेटवूया. सांगली शहरासह जिल्हा काँग्रेस विचारांचा आहे. एकाला उमेदवारी मिळेल, इतर लोक नाराज होतील, मात्र सत्तेत जाणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्रीतपणे काँग्रेस पुढे न्यायची आहे. अशक्य काहीच नाही. राजेश नाईक आता तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे.राजेश नाईक म्हणाले, माईक-नाईक यांचे कधी जमले नसले तरी यापुढे काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी आणि महापालिकेवर काँग्रेसचाच झेंडा फडकवण्यासाठी मेहनत करेन.
सुभाष खोत म्हणाले, विश्वजित आणि विशाल एकत्र आले तर काय होऊ शकते, हे जिल्ह्याने पाहिले आहे. आता महापालिका जिंकायचीच आहे. करीम मेस्त्री म्हणाले, जातीयवादी भाजपला धर्मनिरपेक्ष काँग्रेसच खरा पर्याय आहे. अय्याज नायकवडी म्हणाले, आयुष्यभर काँग्रेसचे खाऊन आता दुसरीकडे फिरणाऱ्यांचे काय करणार आहात. त्यांना पक्षाची कायमची दारे बंद करा. यावेळी इम्रान जमादार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी डॉ. जितेश कदम, माजी आमदार विक्रम सावंत, डॉ. शिकंदर जमादार, मालन मोहिते, प्रमोद सूर्यवंशी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.