कडेगाव शहर : कडेगाव-पलूस तालुक्यातील दोन्ही पंचायत समिती व आठ जिल्हा परिषद गटात काँग्रेसला चांगले वातावरण आहे. काँग्रेस मोठा विजय मिळवेल, असा विश्वास माजी मंत्री आ. डॉ. विश्वजित कदम यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
आ. डॉ. कदम म्हणाले, भाजपा सरकारने गेल्या अनेक वर्षांत ग्रामीण भागाच्या विकासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत या संस्था निधीअभावी कमकुवत करण्यात आल्या आहेत. मात्र असे असतानाही पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून मी स्वतः विधानसभेत सातत्याने आवाज उठवून या भागासाठी जास्तीत जास्त विकास कामे मंजूर करून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे, ते पुढे म्हणाले की, राज्य सरकारकडून ग्रामीण भागाला अपेक्षित निधी मिळत नसतानाही मी मतदारसंघातील पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य केंद्रे, शाळा, दवाखाने, वीज व सिंचन यासारख्या मूलभूत प्रश्नांवर विधानसभेत वारंवार आवाज उठवला आहे. अनेक वेळा विरोधी बाकावर बसूनही प्रशासनाकडून कामे करून घेण्याचा प्रयत्न केला.
ते पुढे म्हणाले, भाजप सरकारने जिल्हा परिषद व पंचायत समिती या संस्था केवळ नावापुरत्या ठेवल्या आहेत. निधी नाही, अधिकार नाहीत, त्यामुळे गावांचा विकास थांबला आहे. तरीही आमदार म्हणून मी मतदारसंघातील गावागावातील प्रश्न थेट शासनदरबारी मांडले आणि शक्य तेवढ्या योजना मंजूर करून आणल्या. पलूस-कडेगाव मतदारसंघात आजही अनेक विकासकामे केवळ स्थानिक पाठपुराव्यामुळे झाली आहेत. त्यामुळे मतदारसंघात काँग्रेसचे सर्व उमेदवारांच्या पाठिशी मतदार उभे राहतील, असा आम्हाला विश्वास आहे. जनतेनेही काँग्रेसच्या पाठिशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.