

मिरज : मी लोकसभेतील अपक्ष खासदार आहे आणि मी लोकसभेत बोलतो म्हणून मला मंत्री आणि अधिकारी घाबरतात, असे वक्तव्य खासदार विशाल पाटील यांनी मिरजेत काल केले.
येथील वेताळबानगर परिसरातील रस्त्याचा प्रारंभ खासदार पाटील यांच्याहस्ते काल झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, संजय मेंढे हे काँग्रेसचे असले तरी भाजपच्या आमदाराकडे निधीसाठी जातात. पालकमंत्र्यांच्या बहुतांशी कार्यक्रमाला उपस्थित असतो, म्हणून माझ्यावर टीका केली जाते. मात्र मला पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमाला जावे लागते. सांगली जिल्ह्यातील निधीच्या तिजोरीच्या चाव्या पालकमंत्र्यांकडे आहेत.
त्यामुळे त्या तिजोरीच्या चाव्या मिळवण्यासाठी मला त्यांच्या कार्यक्रमासाठी जावे लागते. लोकांच्या कामांसाठी निधी मिळवायचा असल्यास आपल्या विरोधकांकडे जावे लागते. त्यामुळेच मला भाजपच्या दोन्ही आमदारांबरोबर राहावे लागते. माझा विचार वेगळा आहे, त्या विचाराशी मी कायम ठाम राहणार. आमदारांचा आमच्याबरोबर वैचारिक वाद असेल, निवडणुका आल्या की आम्ही एकमेकाविरोधात उभे राहू, टीका करू.
ज्यावेळी विकास कामांचा विषय येतो, त्यावेळी आम्ही दोन्ही आमदारांना एकत्रित घेऊन काम करतो. तरीही माझ्या विचारांशी मी कधीही तडजोड करणार नाही. मी अपक्ष जरी निवडून आलो असलो तरी, लोकसभेमध्ये सर्वात जास्त बोलणारा खासदार आहे. त्यामुळे थोडेफार अधिकारी व मंत्री मला घाबरतात. त्यामुळे मला निधी मिळतो, असेही खासदार पाटील म्हणाले.