सांगली : प्रस्तावित हॉकर्स, नो-हॉकर्स झोनला फेरीवाले तसेच विविध संघटनांनी विरोध केला. झोन प्रस्तावित करताना फेरीवाल्यांच्या व्यवसायाबाबत विचार केला नसल्याचा आरोप केला. महापालिकेत गुरुवारी फेरीवाला समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत महापालिका प्रशासनाने सकारात्मक भूमिका न केल्यास बैठकीचा त्याग करून बाहेर पडू, असा इशारा फेरीवाला समिती सदस्यांनी दिला.
बुधवारी सायंकाळी शहरातील विविध विक्रेता संघटनांची बैठक झाली. जनसेवा भाजीपाला विक्रेता संघटनेचे अध्यक्ष शंभूराज काटकर, दयानंद फेरीवाले संघटनेचे अध्यक्ष व महापालिका फेरीवाला समिती सदस्य सुरेश टेंगले, मातोश्री भाजीपाला विक्रेता संघटना पदाधिकारी तसेच महापालिका फेरीवाला समितीचे सदस्य कैस अलगूर, रेखा पाटील, मुजीर जांभळीकर, बेबीताई मुल्ला, निखिल सावंत, अमित मोतूगडे तसेच संघटना पदाधिकारी उपस्थित होते.
महापालिकेने प्रस्तावित केलेल्या हॉकर्स, नो-हॉकर्स झोनला संघटनांच्या बैठकीत विरोध करण्यात आला. सांगली, मिरज आणि कुपवाड या तीनही शहरातील सर्व रस्ते मोकळे करण्याच्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने नो-हॉकर्स झोन प्रस्तावित केले आहेत. त्यामुळे फेरीवाल्यांनी व्यवसाय कुठे करायचा, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. प्रस्तावित केलेले काही हॉकर्स झोन हे महापालिकेच्या ताब्यातील नाहीत. त्यामुळे स्थानिकांचा विरोध होऊ शकतो. महापालिकेने झोन प्रस्तावित करण्यापूर्वी खाऊ गल्ली, भाजी, फळ विक्री केंद्र विकसित करणे आवश्यक होते. काही रस्त्यांवर फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास परवानगी दिली पाहिजे, असे मत संघटनांच्या बैठकीतून पुढे आले.
महापालिकेत गुरुवारी सकाळी 11 वाजता फेरीवाला समितीची बैठक आहे. या बैठकीत फेरीवाले व विक्रेते संघटनांच्या मागणीबाबत महापालिका प्रशासन सकारात्मक नसल्याचे दिसल्यास समितीतील फेरीवाला प्रतिनिधी बैठकीतून बाहेर पडतील व आंदोलनाची पुढील दिशा निश्चित केली जाईल, असेही संघटनांच्या बैठकीत ठरले. शंभूराज काटकर यांनी ही माहिती दिली. दरम्यान, बुधवारी सकाळी फास्टफूड विक्रेते संघटनेची बैठक झाली. या बैठकीत प्रस्तावित नो-हॉकर्स झोनला विरोध केला. सर्व विक्रेत्यांनी हातगाडे, स्टॉल बंद ठेवण्याचा इशारा दिला.