

सांगली : वाढीव घरपट्टीविरोधात तसेच क्षेत्र सभा व जनतेच्या प्रश्नांवर लढा उभारण्याचा निर्धार नागरिक विकास आघाडीच्या बैठकीत सामाजिक कार्यकर्ते वि. द. बर्वे यांनी केला. घरपट्टीतील सामान्य कर पुण्यात 12 टक्के असताना, सांगलीत 22 टक्के कसा, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
येथील कामगार भवनमध्ये नागरिक विकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीत घरपट्टी या विषयावर प्राधान्याने सविस्तर चर्चा करण्यात आली. भाडेमूल्य आधारित घरपट्टी रद्द करण्याबाबत विचारमंथन झाले. तसेच कचरा उठाव कर एकसमान करण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली. पुणे येथे घरपट्टीमध्ये सामान्य कर 12 टक्के आकारला जातो, तर सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेत 22 टक्केप्रमाणे आकारणी होते. या अन्यायकारक दराविरोधात संघटित लढा उभारण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
त्यानंतर क्षेत्र सभा नियमित घेण्यासाठी महापालिकेला भाग पाडण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. क्षेत्र सभेसंदर्भातील प्रकरण न्यायालयात प्रलंबित असले तरी, जनतेचा प्रबळ दबाव निर्माण केल्याशिवाय प्रश्न मार्गी लागणार नाहीत, असे मत मांडण्यात आले. त्यामुळे क्षेत्र सभा नियमित घेण्यासाठी प्रभावी आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. भाडेमूल्य आधारित घरपट्टी लागू करणे, प्रभागनिहाय कार्यालय सुरू करणे, प्रभागवार नागरिकांच्या बैठका घेणे, एक प्रभाग एक उमेदवार, अशी रचना करणे, मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेणे, गोरगरीब नागरिकांनी बांधलेल्या घरांचे अभय योजनेंतर्गत नियमितीकरण करणे आदी मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली.
या सर्व मागण्यांचे निवेदन
नवीन महापौर, विविध समित्यांचे पदाधिकारी, आमदार, खासदार व आयुक्त यांना देण्याचा तसेच महापालिकेच्या नूतन नगरसेवकांच्या पहिल्या कामकाज बैठकीवेळी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीस बाळासाहेब मासुले, पंडितराव बोराडे, आशिष कोरी, विनय सूर्यवंशी, क्रांतिकुमार कांबळे, मयूर घोडके, धनंजय खाडिलकर, रोहित घुबडे-पाटील, प्रशांत जंमगई, शिवाजी त्रिमुखे, आसिफ इनामदार, इरफान केडिया, शशिकला घाडगे, सचिन आरवले यांच्यासह नागरिक विकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.