

सांगली ः दत्त इंडिया प्रा. लि., कंपनीकडून दोन वर्षाच्या हप्त्याची रक्कम रुपये 58 कोटी न मिळाल्याने वसुलीसाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वसंतदादा साखर कारखान्याची 4 एकर जमीन विकण्याचा घाट घातला आहे. जमीन विकण्याचे जाहीर केल्याने साखर कारखान्याच्या सभासदांत संभ्रम तयार झाला आहे. मात्र शेतकरी ही जमीन विकून देणार नाहीत, अशी भूमिका शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी मांडली आहे.
याबाबत संजय कोले म्हणाले, हप्त्याची येणे बाकी दत्त इंडियाकडून येणे आहे. कारखाना कायद्याने बँकेच्या ताब्यात आहे. वसुलीचे अनेक मार्ग उपलब्ध असताना जमीन विक्रीचा पर्यायच का वापरला जाणार? हे ऊस पुरवठादार व शेतकरी सभासदांना समजत नाही. कारखान्यासाठी सभासद, शेतकर्यांनी फार त्याग केला आहे. आजही त्यांच्या ठेवी, 2013-14 ची ऊसबिले तसेच कामगारांची देणी मिळालेली नाहीत. अशावेळी कारखान्याची जमीन विकण्याचे मध्यवर्ती बँकेने जाहीर केल्याने सभासद हवालदिल झाले आहेत. मात्र आम्ही जमीन विकू देणार नाही.
कोले म्हणाले, जिल्ह्यात वसंतदादा गट व भाजप तसेच राष्ट्रवादी (अजित पवार) हे हातात हात घालून वाटचाल करू लागल्याने विचित्र स्थिती आहे. शेतकरी संघटनेच्या विविध आंदोलनांचा लाभ लोकांना आजही होत आहे. पण शेतकर्यांना गुंडाळण्यात संघटनेतील फुटीर व राजकीय पक्ष बरेच यशस्वी झाल्याने सहकारातील शेतकर्यांच्या मालमत्ता विकण्याच्या घोषणा होत आहेत.