

डॉ. सिकंदर जमादार
वसंतदादा पाटील यांना जाऊन 36 वर्षे झाली, तरी सध्याच्या राजकारणात अजूनही त्यांचे नाव घेतले जाते. देशाच्या राजकारणात जसे गांधी, नेहरू, पटेल यांचे नाव, तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात यशवंतराव चव्हाण आणि दादांचे नाव अपरिहार्य आहे. वसंतदादा पाटील हे आधुनिक महाराष्ट्राचे भाग्यविधाते म्हणता येतील, असे उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते.
1930 ला महात्मा गांधींनी सविनय कायदे भंगाची चळवळ सुरू केली, त्यास सर्वसामान्यांचा पाठिंबा मिळू लागला. चळवळीमध्ये हजारो नवशिक्षित तरुण सहभागी होऊ लागले, त्यावेळी वसंतदादांनी या स्वातंत्र्यसंग्रामात स्वतःला झोकून दिले. महात्मा गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांना वैयक्तिक सत्याग्रह करण्याची मुभा दिली. वसंतदादांची बिसूर गावासाठी सत्याग्रही म्हणून निवड झाली. 24 मार्च 1941 रोजी त्यांनी वैयक्तिक सत्याग्रह केला. बिसूरला त्यांना अटक करण्यात आली. त्यांची रवानगी येरवडा तुरंगात झाली आणि ऑक्टोबर 1941 मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईत गोवालिया टँक मैदानावर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरू झाले. वसंतदादा आपल्या सहकार्यांसह रेल्वेने अधिवेशनासाठी मुंबईला पोहोचले. 8 ऑगस्ट 1942 हा काँग्रेस महासमितीच्या अधिवेशनाचा दुसरा दिवस होता. गांधीजींनी करेंगे या मरेंगे ! या वाक्याने आपल्या भाषणाचा समारोप केला. त्या भाषणानंतर पंडित नेहरूंनी ‘छोडो भारत’चा ठराव मांडला, सरदार वल्लभभाई पटेल यांनी अनुमोदन दिले. स्वातंत्र्य लढ्याने आक्रमक आणि निर्णायक वळण घेतले. या अधिवेशनात देशभरातील क्रांतिकारक सहभागी झाले होते. त्यामध्ये वसंतदादा आणि त्यांचे सहकारी होते. त्याच रात्री ते सर्व क्रांतिकारक आपापल्या भागात पोहोचले. महात्मा गांधी आणि इतर नेत्यांच्या अटकेची वार्ता दुसर्यादिवशी सकाळीच देशभरात पोहोचली. इंग्रज सरकारच्या विरोधात संतापाची लाट उसळली ‘चले जाव’, ‘छोडो भारत’, ‘करेंगे या मरेंगे’ अशा घोषणा गावोगावी घुमू लागल्या.
महात्मा गांधींचा तो संदेश घेऊन पेटून उठलेले वसंतदादा आपल्या साथीदारांसह सांगलीला परतले. भूमिगत राहून ‘पेटा व पेटवा’ हा मंत्र घेऊन त्यांनी आपल्या लढ्यास प्रारंभ केला. रेल्वे स्टेशन जाळणे, टेलिफोनच्या तारा तोडणे, चावड्या, पोलिस चौक्यांवर हल्ला करणे, या सर्व कामांसाठी पैसा व शस्त्रे जमविण्यासाठी इंग्रजांच्या मालमत्तेवर तसेच सावकाराच्या घरावर दरोडा टाकणे अशा मोहिमा त्यांनी राबविल्या. हे क्रांतियुद्ध सुरू असतानाच पोलिसांनी त्यांना व त्यांच्या सहकार्यांना अटक केली. स्वातंत्र्याची लढाई सुरू असताना तुरुंगात सडत राहणे वसंतदादांना त्रासाचे वाटत होते.
वसंतदादांनी 24 जुलै 1943 रोजी दुपारी तीन वाजता सहकार्यांसह सांगलीचा मध्यवर्ती तुरुंग फोडला आणि जिवावर उदार होऊन बाहेर पडले. वसंतदादांना गोळी लागून ते जखमी झाल्यामुळे पोलिसांच्या हाती लागले. मात्र या घटनेने ब्रिटिश सरकार हादरून गेले. तुरुंगातील अशी वाटचाल सुरू असतानाच 1946 साल उजाडले. देशामध्ये ब्रिटिश राजवटीविरोधातील संतापाची लाट उसळली होती. भारताला स्वातंत्र्य लवकरच मिळणार, असे वातावरण आणि आशावाद देशभर जनतेच्या मनात निर्माण झाला होता.
पुढे 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला. वसंतदादांनी सांगलीच्या स्टेशन चौकात तिरंगा फडकवून स्वातंत्र्यदेवतेचे स्वागत केले. स्वातंत्र्यानंतर दादांमधील स्वातंत्र्यसैनिकाचे रूपांतर विधायक कार्यकर्त्यात झाले. स्वातंत्र्यसैनिकांच्या, क्रांतिकारकांच्या मोहमयी आकर्षक प्रतिमेत अडकून न पडता दादांनी राष्ट्र आणि समाज उभारणीच्या कामासाठी विधायक सकारात्मक मार्ग पत्करला. दादांच्या जीवनाला मिळालेले हे निर्णायक वळण म्हणता येईल. दादा हे हाडाचे कार्यकर्ते आणि कुशल संघटक होते.
स्वातंत्र्योत्तर काळात नवा देश व नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसेनानी आघाडीवर होते. क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, स्वामी रामानंद भारती, वसंतदादा पाटील, वि. स. पागे, नागनाथअण्णा नायकवडी, जी. डी. (बापू) लाड यांनी स्वातंत्र्य मिळताच विधायक कार्याला वाहून घेतले. सहकारी चळवळीला गती दिली. कृष्णा व वारणा नद्यांवर पाणी योजना केल्या. साखर कारखाने, सूतगिरण्या, सेवा संस्था, दूध संस्था, मार्केट कमिट्या या नेतेमंडळींच्या पुढाकाराने उभ्या राहिल्या. ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट पायावर उभी करण्यासंबंधीचे प्रयत्न झाले. 1960 नंतर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रयोग सुरू करण्यात या स्वातंत्र्यसेनानींचाच पुढाकार होता. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कार्यपद्धतीवरून काँग्रेस पक्ष संघटनेत मतभेद निर्माण झाले. 1949 नंतरचा काळ काँग्रेस पक्षाच्यादृष्टीने संघर्षमयी आणि आव्हानात्मक होता. काँग्रेस पक्षातील शंकरराव मोरे, केशवराव जेधे यांच्यासारखी मंडळी काँग्रेसमधून बाहेर पडली होती. त्यांनी स्थापन केलेल्या शेतकरी कामगार पक्षाने काँग्रेसपुढे आव्हान निर्माण केले होते.
काँग्रेस संघटन गतिमान करणे गरजेचे होते. त्यावेळी यशवंतराव चव्हाण आणि भाऊसाहेब हिरे यांनी वसंतदादांच्या साथीने पक्षाची ताकद वाढविली. त्यानिमित्ताने दादांचा राज्यातील कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क आणि त्यांच्या नेतृत्वातील गुण सर्वांना दिसले. 1950 मध्ये नाशिकला अखिल भारतीय काँग्रेसचे खुले अधिवेशन घेण्यात आले. त्याचे स्वागताध्यक्ष भाऊसाहेब हिरे होते, तर अधिवेशनाचे संघटन वसंतदादांनी केले होते. अधिवेशन शिस्तबद्ध नियोजनामुळे यशस्वी झाले. त्यामुळे काँग्रेस श्रेष्ठींचे लक्ष आपोआपच वसंतदादांकडे वेधले गेले. लोकविकासाची कामे आणि संघटना या दोहोंच्या शिदोरीवर काँग्रेसला 1952 च्या विधानसभा निवडणुकीत निर्विवाद बहुमत मिळाले. सांगलीतून वसंतदादा विजयी झाले.