

सांगली : कर्जाच्या वसुलीपोटी न वठणारा धनादेश देऊन फसवणूक केल्याबद्दल साई कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रोप्रायटर संभाजी निवृत्ती पाटील (रा. प्रतापगंज, पेठ, सातारा) याला एक वर्ष साधी कैद व 50 लाख रुपये व्याजासह दंडाची शिक्षा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी सुनील बी. माने यांनी सुनावली.
संभाजी पाटील यांनी 50 लाख रुपये दंड व या रकमेवर खटला दाखल केल्यापासून रक्कम देईपर्यंत 9 टक्के व्याज, अशी एकूण रक्कम एक महिन्यात बँकेला अदा करायची आहेत. दंडाची रक्कम बँकेला भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्ययालयाने दिले आहेत. तसेच दंड न दिल्यास भरल्यास तीन महिने जादा साध्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
खटल्याची पार्श्वभूमी अशी, _संभाजी पाटील यांनी साई कन्स्ट्रक्शन या फर्मच्या नावे 1 फेब्रुवारी 2006 रोजी 1 कोटी 48 लाख रुपये वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेकडून घेतले होते. 31 मे 2008 रोजी त्यांच्याकडे 2 कोटी 24 लाख 47 हजार 770 रुपये इतकी थकबाकी राहिली होती. या थकबाकीपोटी त्यांनी बँकेला 2 जून 2008 रोजीचा त्यांच्या ॲक्सिस बँक, शाखा सातारा, या खात्यावरील 25 लाखांचा धनादेश दिला होता.
वसंतदादा बँकेने तो धनादेश वठविण्यासाठी त्यांच्या बँक खात्यावर भरला. यावेळी संभाजी पाटील यांच्या बँक खात्यावर पुरेशी रक्कम नसल्याच्या कारणावरून तो धनादेश न वठता परत आला. यामुळे वसंतदादा बँकेने ॲड. आर. बी. उदगावे यांच्यामार्फत सांगली येथील न्यायालयात संभाजी पाटील यांच्याविरुद्ध खटला दाखल केला होता. हा खटला लांबविण्यासाठी पाटील वारंवार सुनावणीसाठी गैरहजर राहिले. त्यामुळे न्यायालयाने त्यांना अनेकदा समन्स व वॉरंट बजावले होते. बँकेचे जनरल मॅनेजर सी. जी. मोटे यांचा जबाब व उपलब्ध पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने शिक्षा सुनावली.