

पलूस : गेल्या अनेक महिन्यांपासून उद्घाटन रखडलेला वसगडे (ता. पलूस) येथील रेल्वे उड्डाण पूल अखेर सोमवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, माजी खासदार संजय पाटील गटातील तसेच स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जेसीबीच्या साहाय्याने पूल खुला केला.
याचवेळी आमदार डॉ. विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांच्याहस्ते विविध विकास कामांचे वसगडे येथे उद्घाटन आयोजित केले होते. काँग्रेस कार्यकर्त्यांनीही त्यांच्याहस्ते नारळ फोडून या पुलाचे प्रतिकात्मक उद्घाटन केले. यावेळी सर्वपक्षीय कृती समिती, नागरिक जागृती मंच, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काम पूर्ण होऊनही अधिकृतरित्या उद्घाटन झाले नसल्याने हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नव्हता. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. पुलाखालून जाणारा रस्ता खड्डेमय झाल्याने वाहनचालकांना धोकादायक स्थितीचा सामना करावा लागत होता. सांगली-पलूस-कराड मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने हा उड्डाण पूल लवकरात लवकर सुरू करण्याची गरज होती.
रेल्वे गेट वारंवार बंद होत असल्याने नागरिकांना दररोज तासन् तास प्रतीक्षा करावी लागत होती. अखेर स्थानिकांच्या पुढाकाराने आणि सामाजिक संघटनांच्या माध्यमातून हा पूल खुला करण्यात आला. आता वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. यामुळे वाहनचालक, शेतकरी, व्यावसायिक व प्रवासी नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी सांगितले की, राजकीय श्रेयवादात न पडता आम्ही केवळ नागरिकांच्या सोयीसाठी हा पूल खुला केला आहे.